ड्रायपोर्टच्या प्रकल्पावरून जिल्ह्यात राजकारण पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:15 AM2017-12-25T00:15:04+5:302017-12-25T00:16:14+5:30
सांगली : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेळी-मेंढी संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी वापरात आणण्याचा प्रस्ताव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केंद्र शासनाकडे पाठविला असतानाच, राष्टÑवादी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यास विरोध केला आहे. प्रकल्पासाठी शेळी-मेंढी संशोधन केंद्राच्या जागेऐवजी अन्य जागा शोधावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे ड्रायपोर्टवरून जिल्ह्याचे राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
धनगर समाजाच्या उन्नतीसाठी दिवंगत मंत्री शिवाजी बापू शेंडगे यांनी १९७४ मध्ये रांजणी येथे बावीसशे एकर जमिनीवर शेळी-मेंढी संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्टच्या नावाखाली हडप करण्याचा खासदार संजय पाटील यांचा डाव असल्याचा आरोप जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
शेंडगे म्हणाले की, ड्रायपोर्ट करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही, मात्र त्यासाठी शेळी-मेंढी संशोधन केंद्राची जागा वापरण्यास आमचा विरोध आहे. ही जागा १९७४ पासून धनगर समाजाच्या उन्नतीच्या उद्देशाने राखीव ठेवली आहे. त्यामुळे त्या जागेचा उद्देश बदलण्यास आम्ही विरोध करू. त्यासाठी पक्षीय पातळीवर नेत्यांच्या माध्यमातून आम्ही शरद पवारांपर्यंत हा विषय मांडू. केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही धनगर समाजाचे शिष्टमंडळ भेटणार आहे. धनगर समाजातर्फे आंदोलनही छेडण्यात येईल.
यापूर्वीही विविध राजकीय मंडळींनी रांजणीतील जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येकवेळी धनगर समाजाने एकत्र येऊन हा प्रयत्न हाणून पडलेला आहे. यावेळीदेखील धनगर समाजोन्नतीसाठी राखीव असलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत ड्रायपोर्टसाठी देणार नाही. या संशोधन केंद्राच्या उर्वरित जागेत धनगर समाजातील शेळी-मेंढी पालन करणाºया कष्टकºयांना भाडेतत्त्वावर ही जागा द्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. केवळ या जागेचा अट्टाहास कशासाठी सुरू आहे? रांजणी व तालुक्याच्या अन्य परिसरात अशा अनेक जमिनी पडून आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या जागेचा प्रस्ताव भाजप नेत्यांनी द्यावा, असेही त्यांनी सुचविले. देशातील सर्वात मोठे ड्रायपोर्ट दिल्ली येथील तुगलकाबाद येथे आहे. ते ड्रायपोर्टसुद्धा शंभर एकर क्षेत्रावर आहे. मात्र रांजणी येथील ड्रायपोर्टसाठीच इतक्या मोठ्या जमिनीवर दावा करण्याचे कारण समजत नाही, असे शेंडगे म्हणाले.
जागेची स्थिती
रांजणी येथे शेळी-मेंढी संशोधन केंद्राची २ हजार २०० एकर जागा आहे. याच जागेचा प्रस्ताव खासदार संजयकाका पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर व अन्य नेत्यांनी केंद्र शासनाकडे दिला आहे. प्रकल्पासाठी २ हजार एकर जागा लागेल. या जागेच्या बाजूनेच विजापूर-गुहागर हा राष्टÑीय महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे आपोआप रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पाचा विकास आराखडा येत्या महिन्याभरात निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्यासह अधिकाºयांचे पथक लवकरच रांजणीच्या जागेला भेट देणार आहे.
काय आहे ड्रायपोर्ट
हे एक कोरडे बंदर असणार आहे. फुले, द्राक्षे, डाळिंब, दूध अशा शेती व शेतीपूरक उद्योगातील उत्पादनांना उपयोगी ठरणार आहे. येथून थेट निर्यात करण्यासाठी याठिकाणी संबंधित सर्व शासकीय कार्यालयेही थाटली जाणार आहेत. या पोर्टचा फायदा सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील शेतकºयांनाही होणार आहे. परदेशातून प्रक्रियेसाठी येणाºया कच्च्या मालासाठीही हे बंदर उपयोगी ठरणार आहे, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
रोजगाराचा गाजावाजा : निव्वळ खोटा
ड्रायपोर्टच्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा भाजपचे लोक करीत आहेत. वास्तविक यात यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्याने रोजगार फारसा उपलब्धच होणार नाही. त्यामुळे विनाकारण जागा हडप करण्यासाठी रोजगाराचा मुद्दा कुणीही उपस्थित करू नये, असेही शेंडगे म्हणाले.