मिरजेत ‘बालगंधर्व’समोरच नाट्यप्रवेश

By admin | Published: June 26, 2015 11:07 PM2015-06-26T23:07:16+5:302015-06-27T00:20:40+5:30

कलाकारांचे अभिनव आंदोलन : बंद नाट्यगृहाबाबत पथनाट्यातून निषेध

Drama entrance in front of 'Balgandharva' in Miraj | मिरजेत ‘बालगंधर्व’समोरच नाट्यप्रवेश

मिरजेत ‘बालगंधर्व’समोरच नाट्यप्रवेश

Next

मिरज : नटसम्राट बालगंधर्वांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मिरजेतील नाट्यकलाकारांनी बंद असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंद प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम सादर केला. नाट्यकलाकारांनी रस्त्यावरच बालगंधर्वांचे नाट्यप्रवेश, नाट्यगीते, पथनाट्य, नाटिका, नृत्य सादर करीत अभिनव पध्दतीने आंदोलन केले.
सुरक्षा उपाययोजनांअभावी गेल्या सहा महिन्यांपासून बालगंधर्व नाट्यगृह बंद आहे. यामुळे नाट्यकलाकार व नाट्यरसिकांची गैरसोय होत असल्याने सांगलीतील नाट्यगृह व खासगी सभागृहात नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बालगंधर्वांनी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले, त्या मिरजेत बालगंधर्वांच्या स्मरणार्थ महापालिकेने अद्ययावत नाट्यगृह उभारले आहे. मात्र या नाट्यगृहात त्रुटी असल्याने नाट्यगृह सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र नाट्यगृह सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याने रंगकर्मींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर नाट्यगृहाभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी नसल्याने नाट्यगृह बंद अवस्थेत आहे.
नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीदिनी नाट्यगृह बंद असल्याने संतप्त कलाकार व नाट्यरसिकांनी नाट्यगृहाच्या आवारात बालगंधर्वांची जयंती व नाट्यप्रयोग सादर करण्याची परवानगी मागितली होती. महापालिका प्रशासनाकडून कार्यक्रमास परवानगी मिळाली नसल्याने नाट्यकलाकारांनी नाट्यगृहाच्या बंद प्रवेशद्वारासमोर नाट्य कार्यक्रम सादर करून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.अमूल्या भाटवडेकर यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकातील प्रवेश सादर केला. धनंजय जोशी, संजय रूपलग यांनी वात्रटीका सादर केली. नाट्यकलाकारांनी नांदी व ‘नमन नटवरा’, ‘संगीत शारदा’ या बालगंधर्वांच्या संगीत नाटकांतील नाट्यप्रवेश व नाट्यगीते सादर केली. नीलेश जोशी, शुभदा गोखले यांनी नाट्यगीते म्हटली. राजेंद्र नातू यांनी हार्मोनियमसाथ व सदानंद गोखले यांनी तबलासाथ केली.
स्मिता महाबळ, अमित पटवर्धन, डॉ. भालचंद्र साठ्ये, प्रसन्न चिपलकट्टी, तानाजी कागवाडे, रवींद्र फलटणकर, अमोल कांबळे, प्रतीक धुळूबुळू, ऋषिकेश कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, चैतन्य तांबोळकर यांच्यासह नाट्यकलाकार व नाट्यरसिकांनी अभिनव पध्दतीने आंदोलन करीत बालगंधर्व नाट्यगृहाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. (वार्ताहर)

‘रस्त्यावरच बालगंधर्व अवतरले’
‘रस्त्यावरच बालगंधर्व अवतरले’, हे पथनाट्य सादर करण्यात आले. नवोदित कलाकार रस्त्यावर नाटकाची रिहर्सल करीत असल्याचे पाहून नटसम्राट बालगंधर्व त्यांना विचारणा करतात. शहरातील मोठे नाट्यगृह बंद असल्याने रंगकर्मींवर ही अवस्था आल्याचे पाहून बालगंधर्वांना वाईट वाटते. अशा सद्यस्थितीचे चित्रण पथनाट्यात करण्यात आले होते. पथनाट्याला रसिकांचाही जोरदार प्रतिसाद मिळाला. विशाल कुलकर्णी हा बालकलाकार बालगंधर्वांच्या वेशभूषेत होता.

Web Title: Drama entrance in front of 'Balgandharva' in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.