नाट्यपंढरीतील नाट्यसंस्थांना राजमान्यता नाहीच; शासनाच्या यादीत सांगलीतील एकही संस्था नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 08:08 PM2019-12-12T20:08:19+5:302019-12-12T20:09:29+5:30
मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मात्र यात सांगलीची एकही संस्था नाही.
संतोष भिसे
सांगली : शास्त्रीय गायन, वादन, नृत्य तसेच लोककलेत पारंगत विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो. ते देण्यासाठी राज्यभरातील ६७ अधिकृत संस्थांची यादी सांस्कृतिक संचालनालयाने नुकतीच जाहीर केली. मात्र नाट्यपंढरी म्हणवणाऱ्या सांगलीतील एकही संस्था यादीत नाही. सांगलीच्या कलाक्षेत्राची वाढ खुंटली की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शासनाच्या यादीत गायन, वादन व नृत्याच्या परीक्षा घेणाऱ्या पन्नास, तर लोककलेसाठीच्या सतरा संस्थांचा समावेश आहे. खेळाडूंना दहावीत अतिरिक्त गुणांची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे, कलाक्षेत्रासाठी मात्र नव्हती. राज्यातील कलासंस्थांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर २०१७ मध्ये कला क्षेत्रासाठीही गुणांचा निर्णय झाला. मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मात्र यात सांगलीची एकही संस्था नाही.
सांगलीत अनेक विद्यार्थी नाट्यक्षेत्रात काम करतात. कलेच्या एका टप्प्यावर प्रवाहातून बाहेर पडतात, त्यानंतर चरितार्थासाठी नाटकातील योगदानाचा काहीही फायदा होत नाही. सांगली-मिरजेत काही संस्था नृत्य, गायन, वादनाचे वर्ग घेतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसवतात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा फायदा मिळतो. नाटकासाठी मात्र अशी संस्था सांगलीत नाही. परीक्षा घेणारी पायाभूत संस्था उभी करण्यापेक्षा गुरुकुल पद्धतीनुसार कला शिक्षणावरच येथील संस्थांचा भर आहे.
-------
ह्यसांगलीत २२ हून अधिक नाट्यसंस्था असताना एकही संस्था यादीत असू नये, हे आश्चर्यजनक आहे. जिल्'ात नाट्य परिषदेच्या शाखाही सशक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा व्हायला हवाह्ण.
डॉ. दयानंद नाईक, ज्येष्ठ रंगकर्मी
---
असे मिळतात गुण
शास्त्रीय गायन, वादन व नृत्याच्या तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दहावीत पाच अतिरिक्त गुण मिळतात. पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहा गुण मिळतात.
---------
चौकट
मुंबई-पुण्याच्या संस्थांचाच भरणा
शासनाने जाहीर केलेल्या यादीत गायन, वादन व नृत्यासाठी मुंबई-पुण्याच्या संस्थांचाच भरणा आहे. लोककलेसाठीच्या सतरा संस्थांच्या यादीत मात्र पुण्याची फक्त एक व मुंबईच्या दोन संस्था आहेत. उर्वरित चौदा राज्यभरातील आहेत. राज्यात सांस्कृतिक मंत्री नसल्याने यादीला विलंब होत होता. संस्थांनी पाठपुरावा करून ती मंजूर करून घेतली.
-------