बेळंकीत श्रीराम बझारवर दरोडा सहा लाखाचा माल लंपास : दहा ते बारा जणांच्या टोळीचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:23 PM2018-03-16T21:23:31+5:302018-03-16T21:23:31+5:30
सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील विकास गव्हाणे यांच्या मालकीच्या श्रीराम बझार या मॉलवर दहा ते बारा जणांच्या टोळीने शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास दरोडा टाकला.
सलगरे : बेळंकी (ता. मिरज) येथील विकास गव्हाणे यांच्या मालकीच्या श्रीराम बझार या मॉलवर दहा ते बारा जणांच्या टोळीने शुक्रवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास दरोडा टाकला. चोरट्यांनी मॉलमधील मोबाईल, भांडी, कपडे यासह सुमारे सहा लाखांचा माल लंपास केला. मॉलमधील सीसीटीव्हीत चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली व श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला.
बेळंकी येथे विकास गव्हाणे यांच्या मालकीचा श्रीराम बझार आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मॉल बंद केला. मध्यरात्री दोनच्या सुमारास चारपैकी दुसऱ्या क्रमांकाचे शटरचे कुलूप व कडी कापून चोरट्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजनुसार किमान प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये दोघे आणि बाहेर दोघे असे दहा ते बारा जण बॅटरी वापरून चोरी करीत असल्याचे मिळून आले आहे. चोरट्यांनी मॉलमधील १२५ मोबाईल, कपडे, पितळी भांडी आणि काही भांड्यांचे सेट असे सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य मोठ्या वाहनाच्या मदतीने लंपास केले. समोरील एक सीसीटीव्ही खाली वाकवून त्याचे फुटेज उपलब्ध होऊ दिले नाही. काही जणांनी तोंडाला कापड बांधले असल्याचे फुटेजमध्ये दिसल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी मॉल फोडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीसपाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक जाधव आणि तळपे यांनी भेट दिली व पंचनामा केला. सांगली येथील श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मॉलच्या आजुबाजूलाच श्वान घुटमळले. बेळंकी येथील ही दुसरी मोठी घटना आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. या घटनेने बेळंकी परिसरात आणि मिरज पूर्व भागात खळबळ उडाली आहे.
जनरल स्टोअर्स फोडले
श्रीराम बझारच्या शेजारीच राहुल गव्हाणे यांच्या मालकीचे शिवकृपा जनरल स्टोअर्स आहे. या दुकानाचे कुलूप व कडी तोडून आतील गॉगल, पट्टे, चार हजार रुपये असे साहित्य लंपास केले. सुदैवाने इतर साहित्याची चोरी अथवा मोडतोड केली नाही. या दोन्ही घटनास्थळी भेट देऊन ठसेतज्ज्ञांनी ठशांचे नमुने घेतले आहेत.
स्टायलिश चोरटे
चोरट्यांनी पायात बूट, जीन पॅन्ट आणि जर्किन असा पेहराव केला होता. कपडे चोरताना स्वत:च्या मापाचेच कपडे घेतले. मॉलमधील माल तेथीलच पोती वापरून भरून दुकानाबाहेर आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.