लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे..; नाट्यपंढरी सांगलीत रंगला नवा प्रयोग

By अविनाश कोळी | Published: April 10, 2024 11:52 AM2024-04-10T11:52:56+5:302024-04-10T11:53:34+5:30

अविनाश कोळी ‘टू बी ऑर नॉट टू बी... लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे. या राजकीय उकीरड्यावर खरकट्या ...

Dramatic developments in Sangli Lok Sabha candidature | लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे..; नाट्यपंढरी सांगलीत रंगला नवा प्रयोग

लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे..; नाट्यपंढरी सांगलीत रंगला नवा प्रयोग

अविनाश कोळी

‘टू बी ऑर नॉट टू बी... लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे. या राजकीय उकीरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं, बेशरम, लाचार, आनंदानं की, फेकून द्यावं प्रतिष्ठेचं लक्तर त्यात गुंडाळल्या राजकीय जाणिवेच्या यातनेसह राजकारणाच्या काळ्याशार डोहामध्ये?’ असे काहीसे वेगळेच संवाद पडद्याआडून नाट्यगृहात घुमत होते. प्रेक्षकांच्या कानावर पडणारे हे संवाद नेमके कोणाचे असावेत, याचा अंदाज बांधला जात होता.

नाट्यपंढरी सांगलीत अनोखा नाट्यप्रयोग होणार म्हणून राज्यभरातील प्रेक्षक जमलेले. घंटा वाजली, पण पडद्याआडच्या गोंधळाने प्रेक्षकही ताटकळले. ‘कुणी उमेदवारी देता का उमेदवारी’ असा आवाज घुमला. पडदा उघडणार कधी अन् पात्रपरिचय होणार तरी कधी अशा सवालांनी प्रेक्षकांना बैचेन केले. पडदा उघडला, तसा एक लाइट एका योद्ध्यावर पडला. तो आव्हान देत उभा होता, पण दुसऱ्या व तिसऱ्या पात्रांचा विंगेतच ‘संवाद’ सुरू झाला. रंगमंचावरील प्रवेशावरून दोघांमध्ये जुंपली. मुख्य पात्रावरून चाललेले द्वंद्व एव्हाना प्रेक्षकांपर्यंत पोहचले. सूत्रधार कुठे आहे, असा सवालही कुणीतरी हलक्या आवाजात उपस्थित केला. 

नाट्यलेखकही प्रयोगाला नव्हते. प्रवेश एकाचा होणार की, दोघांचा? याची उत्सुकता ताणली गेली. दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक, निर्माते यांच्यातही समन्वय होईना. ग्रीन रूममध्ये बैठक झाली अन् अखेर पैलवान गड्याला रंगमंचावर योद्धा म्हणून पाठविण्यात आले अन् वादावरचा पडदा पडला. दोन पात्रांचा रंगमंचावर वावर सुरू असतानाच ‘मीच तो, मीच तो’ असा आवाज विंगेतून घुमला अन् दोन्ही योद्धे बुचकळ्यात पडले. लढाई कोणी कोणाशी करायची, असा सवाल उपस्थित झाला.

पैलवानाने प्रश्नांकीत चेहऱ्याने विंगेत उभारलेल्या दिग्दर्शकाकडे पाहिले. त्यांचा इशारा होताच रणशिंग फुंकल्याचा आवाज आला. संभ्रमाचा धूर रंगमंचावर सोडण्यात आला. याच धुरामध्ये दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांशी नजरा नजर केली अन् मध्यंतराचा पडदा पडला. प्रेक्षक उठायच्या तयारीत असतानाच एक आवाज घुमला...

‘तुफानाला महाल नको,
राजवाड्याचा सेट नको,
पदवी नको, हार नको,
एक हवी हक्काची खुर्ची
तुफानाला बसण्यासाठी’

कुणी उमेदवारी देता का उमेदवारी?

Web Title: Dramatic developments in Sangli Lok Sabha candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.