शिक्षकांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढू : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:16 PM2018-11-25T23:16:06+5:302018-11-25T23:16:50+5:30
इस्लामपूर (जि. सांगली ) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही ...
इस्लामपूर (जि.सांगली) : राज्यातील शासकीय शाळांना सरकार पायाभूत सुविधा देत आहेत. येत्या राज्याच्या अंदाजपत्रकात शिक्षक परिषदेच्या काही मागण्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व अर्थमंत्र्यांसमवेत व्यापक बैठक घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विविध संघटनांच्यावतीने ‘मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण वाचवा’ ही राज्यव्यापी जनपरिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या जनपरिषदेत ११ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीची धडपड कौतुकास्पद आहे.
आघाडी सरकारच्या काळात आम्ही दोघांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. यापुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत राहू.या जनपरिषदेचे मुख्य संयोजक भगवानराव साळुंखे म्हणाले, मातृभाषिक नि:शुल्क शिक्षण प्रणाली सक्षम झाली पाहिजे, यासाठी ही जनपरिषद घेत आहोत. शैक्षणिक संस्था व शाळांना मंजुरी देण्याचे यापूर्वीचे सर्व निकष डावलून आता राज्यात शाळांचा चातुर्वण्य निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रात व्यापार करून नफा कमावणारी वृत्ती शिरली असून, त्याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची पाठ...!
या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाठ फिरवल्यामुळे शिक्षकांची घोर निराशा झाली. सकाळची बोचरी थंडी आणि त्यानंतरच्या भर उन्हात शिक्षक बसले होते. या परिषदेलाही शिक्षकांची उपस्थिती जेमतेमच राहिली.