मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Published: November 2, 2016 12:00 AM2016-11-02T00:00:08+5:302016-11-02T00:00:08+5:30

भारत पाटणकर : बलवडी (भा.) येथे बळिराजा धरणाचा वर्धापन दिन कार्यक्रम

Draw a white paper about the Maratha reservation | मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

Next

आळसंद : राज्यातील एकूण लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. मात्र, मराठा समाज आजही विकासापासून वंचित व मागासलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती असल्याने सरकारने मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
बलवडी (भा.) तांदळगाव (ता. खानापूर) येथील येरळा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बळिराजा धरणाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाटणकर बोलत होते.
यावेळी सरपंच मनीषा दुपटे, मोहनराव कदम, अ‍ॅड. कृष्णा पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अनिल पाटील, विलास चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यातील युती शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देणे अवघड आहे. हे विधान फडणवीस यांनी मागे घ्यावे. २५ एप्रिलला झालेल्या बैठकीत सर्वांना समन्यायी पाणी वाटप पध्दतीने पाणी देता येईल. गेल्या वीस वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू आहे. त्याला आता यश आले आहे.
टेंभू, ताकारी योजनेचे वीज बिल शासनाने १०० टक्के भरावे, दुष्काळी भागातील लोक उंचावर राहिले आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करत सध्या ८० टक्के वीज बिल शासन, तर २० टक्के वीजबिलबाबत लवकरच जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा. बळिराजा धरण पात्रातील गाळ काढण्यासाठी किमान १५ दिवस पात्र कोरडे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तरच नदीपात्र स्वच्छ करता येणे शक्य असल्याचे डॉ. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी अ‍ॅड. कृष्णा पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, देवकुमार दुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, हसिना मुल्ला, सुरेश चव्हाण, विश्वास दुपटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
अग्रणी बारमाही : काम चुकीच्या पध्दतीने
खानापूर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या अग्रणी नदी बारमाही करण्याचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले आहे. नदीपात्रातील गाळ काढून बाजूला टाकला होता. तो गाळ पावसाने पुन्हा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. मराठवाड्यातील मांजरा नदीचेही काम अशा चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना केला.

Web Title: Draw a white paper about the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.