पाण्याविना १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र वंचित-ताकारी योजनेचे चित्र : १० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:52 PM2019-01-08T23:52:59+5:302019-01-08T23:56:33+5:30
कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे.
- अतुल जाधव ।
देवराष्ट : कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे. ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची वाढ ही कासवगतीने असल्यामुळे शेतकºयांचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित राहत आहे. ३४ वर्षांत योजनेचा आराखडा शेकडोपटीने वाढूनही निम्मे लाभक्षेत्रही ओलिताखाली येऊ शकलेले नाही.
ताकारी उपसा सिंचन योजनेतून सहा तालुक्यातील २७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वास्तविक योजना सुरू झाल्यापासून ३४ वर्षांच्या काळात यापैकी इंच न इंच जमीन ओलिताखाली यावयास हवी होती; मात्र राज्यकर्त्यांसह प्रशासनाची इच्छाशक्ती व निधीची कमतरता यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही योजनेचे काम आजही अपूर्ण राहिले आहे.
ताकारी योजनेचे पाणी २००२-०३ ला कडेगाव तालुक्यात दाखल झाले. तेव्हापासून मागील दोन वर्षांपर्यंत या योजनेवर स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभाग कार्यरत नव्हता. यामुळे या विभागाची जबाबदारी योजनेच्या बांधकाम विभागावरच होती. अपुºया कर्मचारी संख्येमुळे बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे सदोष मोजणीमुळे लाभक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नव्हते.
ताकारी योजनेसाठी स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभागाची निर्मिती झाल्यानंतर योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून लाभक्षेत्रात थोडीच वाढ झाल्याचे दिसत आहे.
यामुळे अजूनही लाभक्षेत्राची मोजणी सदोषच झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच २०१२-१३ व १३-१४ मधील ओलिताखाली आलेल्या लाभक्षेत्राचा विचार केल्यास मोठी तफावत पाहावयास मिळत आहे.ओलिताखाली आलेले क्षेत्र २०११-१२ मध्ये ५४४८ हेक्टर, १२-१३ मध्ये ६३४२, १३-१४ मध्ये ६४०० हेक्टर, तर १४-१५ मध्ये ७८१६ इतके झाले होते. १५-१६ मध्ये ७९३५ हेक्टर व १६-१७ मध्ये ९०७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे; तर १७-१८ मध्ये १०७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.
योजनेचे लाभक्षेत्र असलेल्या कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातील लाभक्षेत्राचा अभ्यास केल्यास या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तसेच भाजीपाला व द्राक्ष, डाळिंब यांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील उसाचे गाळप व ऊस पिकाची नोंद लक्षात घेता, योजनेचे ओलिताखाली आलेले लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र योजनेच्या लाभक्षेत्राची मोजणी सदोष होत असल्याने व यामध्ये काही अडचणी येत असल्याने योजनेला काही कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
५ वर्षात ओलिताखालील क्षेत्र : ३ हजार हेक्टरने वाढले
ताकारी योजनेचे पाणी जिथपर्यंत पोहोचले आहे, तिथपर्यंतचे क्षेत्र १३८५२ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात आले आहे. त्यापैकी १०७६५ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात आहे. २०१४-१५ मध्ये ७८१६ हेक्टर ओलिताखालील क्षेत्रात ३ हजार हेक्टरने वाढ होऊन ते २०१८ पर्यंत १०७६५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.