‘खाकी वर्दी’च्या स्वप्नाला भरती रद्दमुळे लागला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:27+5:302021-01-13T05:06:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शासनाने पोलीस भरतीचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाने पोलीस भरतीचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना निराशेला सामोरे जावे लागले आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही भरतीसाठी मैदानावर तयारी करणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे आता शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची कमी संख्या व वाढत्या ताणामुळे शासनाने यंदा पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. तरुणांनी या निर्णयाचे स्वागत करत मैदानावर घाम गाळण्यास सुरुवात केली होती. धावण्यासह लांबउडी, उंचउडीसह फिटनेस कायम ठेवण्यावर भर दिला होता, तर याच कालावधीत परीक्षेचीही तयारी सुरू होती.
मैदानी चाचणीअगोदर लेखी परीक्षा असल्याने त्याची जोरात तयारी सुरू होती. शासनाने आता काही काळासाठी भरती प्रक्रिया स्थगित ठेवल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
चौकट
अकराशे लोकांमागे एक पोलीस
जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख आहे, तर पोलीस दलात सध्या अडीच हजारांवर पोेलीस कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस दलावर नेहमीच ताण असतो. सध्या कोरोनासह इतर सर्व ठिकाणी पोलीस आपली कामगिरी बजावत असताना कमी संख्येमुळे कामाचा ताण वाढत आहे. जिल्ह्यात सरासरी १,१०० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असल्याचे चित्र आहे.
कोट
घरातील सर्व कामे आटोपून शेतातील कामात कुटुंबियांना मदत करून मी पोलीस भरतीची तयारी करत आहे. पोलीस होण्याचे स्वप्न असल्याने भरतीची घोषणा झाल्यापासून मी तयारी करत आहे. आता शासनाच्या पुढील आदेशापर्यंत थांबावे लागणार आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन भरती पूर्ण करावी.
- वैष्णवी माने
कोट
शासनाने पोलीस भरतीची घोषणा करण्याच्या आधीपासूनच मी तयारी करत आहे. यासाठी नियमित मेहनत घेण्याबरोबरच घरातील कामांकडेही लक्ष न देता अभ्यास करत आहे. आता शासनाने भरती प्रक्रिया रद्द करून आम्हाला अडचणीत टाकले आहे. वयोमर्यादेची अडचण असलेल्या सहकाऱ्यांना अधिक आव्हाने आहेत.
- सुरज वाघमारे
कोट
गावात भरतीची तयारी करता येत नाही म्हणून मित्रांसह मी सांगलीत राहण्यास आलो आहे. याठिकाणी सर्व तयारी करत असताना आता भरती रद्द झाल्याने पुन्हा आम्हाला गावाकडे जावे लागणार आहे. त्यात आतापर्यंत केलेली सर्व तयारीही वाया जाण्याचीच भीती असल्याने भरती लवकर व्हावी.
- विजय मोटे, जत