ड्रेनेजची पूर्ण कामे घुसडण्याचा डाव
By admin | Published: July 14, 2015 12:41 AM2015-07-14T00:41:04+5:302015-07-14T00:41:04+5:30
महापालिका सदस्यांतून नाराजी : सत्ताधारी, प्रशासनाची चलाखी
सांगली : सांगली, मिरज शहरातील मंजूर ड्रेनेज योजनेत पूर्ण झालेली काही कामे घुसडण्याचा डाव प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप होऊ लागला आहे. या प्रस्तावाला बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे. हा विरोध हाणून पाडण्यासाठी काही नगरसेवकांच्या प्रभागातील ड्रेनेजची कामेही नव्या प्रस्तावात समाविष्ट करून त्यांना गाजर दाखविण्यात आले आहे. या विषयावर महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची महासभा २० रोजी होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर ड्रेनेजच्या वाहिन्यांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा विषय घेण्यात आला आहे. पण या विषयपत्रात प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी संगनमताने चलाखी केली आहे. पालिकेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागात मंजूर प्रकल्प आराखड्यात समाविष्ट नसलेल्या जागी ड्रेनेज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यापोटी ठेकेदाराला काही रक्कमही अदा केली आहे. पण त्याला महासभेची मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे बिलाबाबत प्रशासन अडचणीत सापडले आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी घेण्याचा प्रयत्न झाला. पण महासभेत गोंधळ झाल्याने हा ठराव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे कारभारी नगरसेवकांना धक्का बसला.
यावर तोडगा काढण्यासाठी आता नवीन शक्कल लढविली गेली आहे. मिरजेतील कामासोबतच सांगलीतील काही प्रभागात ७५ हजार मीटर ड्रेनेज वाहिन्या टाकण्याची आवश्यकता असल्याची सबब पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतून जुन्या प्रस्तावाला होणारा विरोधही मावळेल आणि मिरजेत पूर्ण झालेल्या ड्रेनेज वाहिन्यांचा मूळ आराखड्यात समावेश होईल. त्यातून प्रशासन व कारभारी नगरसेवकांची झालेली कोंडीही फुटेल, असा डाव आखला आहे.
पण या प्रस्तावाला बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे. ही कामे कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, असा नवा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्याची जोरदार मागणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)