सांगलीकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा, मात्र..
By अशोक डोंबाळे | Published: September 27, 2024 06:56 PM2024-09-27T18:56:38+5:302024-09-27T18:57:57+5:30
रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार
सांगली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार १०८ टक्केवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४७ टक्के जादा पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. चक्क ३९ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार आहे.
मान्सून पाऊस संततधार झाला आहे. सध्या परतीच्या पावसाची ही दमदार सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत १०८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच तलावांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यामध्ये सिद्धेवाडी (ता. तासगाव), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि मोरणा (ता. शिराळा) हे मोठे पाझर तलाव आहेत. या तलावांची १ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. द्या या तलावांमध्ये १हजार ४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. यापैकी मोरणा, सिद्धेवाडी आणि बसाप्पावाडी तलाव १०० टक्के भरले असून दोड्डनाला ३६ टक्के तर संख आजही कोरडा आहे.
छोट्या तलावांची संख्या ७८ असून यामध्ये ६ हजार १५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. सध्या या तलावांमध्ये ४ हजार ३७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जवळपास ७३ टक्के छोटे तलाव भरले आहेत. तासगाव, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आटपाडी, खानापूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांमधील ३९ तलाव १०० टक्के भरले आहेत.
..तरीही १२ तलाव कोरडेच
जत तालुक्यातील ११ आणि आटपाडी तालुक्यातील १ असे १२ तलाव आजही कोरडेच आहेत. कोरडे तलाव जत तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
असा आहे पाणीसाठा
तालुका - तलाव संख्या - पाणीसाठ्याची टक्केवारी
तासगाव - ७ - १००
खानापूर - ८ - ८७
कडेगाव - ७ - ८०
शिराळा - ५ - १००
आटपाडी - १३ - ८४
जत - २७ - ३८
क.महांकाळ - ११ - ८५
मिरज - ०३ - ९७
वाळवा - ०२ - १००
मागील वर्षी २३ टक्के पाणीसाठा
मागील वर्षी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील मोठ्या पाच तलावांमध्ये ३३ टक्के तर छोट्या ७८ तलावांमध्ये २० टक्केच पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यात सरासरी केवळ २३ टक्केच पाणीसाठा होता. यामुळे जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये जवळपास १०० टँकर पिण्याच्या पाण्यासाठी चालू होते.