दुष्काळी परिस्थिती; सांगली जिल्ह्यात एक कोटीचे चारा बियाणे वाटप होणार
By अशोक डोंबाळे | Published: March 6, 2024 03:39 PM2024-03-06T15:39:21+5:302024-03-06T15:42:19+5:30
चाऱ्यासाठी शंभर टक्के अनुदान: पाच दुष्काळी तालुक्यात चारा टंचाई
सांगली : जिल्ह्यातील दूभत्या जनावरांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चारा बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील एक कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चारा टंचाईची भीषणता वाढू लागली आहे. दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाणेसाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद केली जाते. तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते, त्यानुसार बियाणे दिले जाते.
परंतू यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वच तालुक्यात चारा टंचाई भासणार असल्याने चारा बियाणांच्या निधीत ७५ लाखांनी वाढ केली आहे. अर्थात यंदा बियाणांसाठी एक कोटी निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ३० लाख रुपयांचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले होते.
दुसऱ्या टप्प्यात ७० लाख
दुसऱ्या टप्प्यात ७० लाख रुपयांची तरतूदीतून बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित विभागाला अर्ज मागवण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. तसेच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची चारा बियाणे मागणी अर्ज घेतले. प्रत्येक तालुक्यातून चारा बियाणांसाठी मागणी आली आहे.
शेतकऱ्यांनी चारा बियाणे मागणी केल्यानुसार याची तालुकानिहाय याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर ड्रॉपध्दतीने शेतकऱ्यांनी निवड करुन शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येक लाभार्थीला सात किलोचे पॅकींगमध्ये १४०० रुपयांचे मका बियाणे वाटप केले आहे.