मिरज पूर्वच्या मानगुटीवर दुष्काळ ;म्हैसाळ योजना नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:19 PM2018-10-29T23:19:18+5:302018-10-29T23:19:22+5:30
दादा खोत । लोकमत न्यूज नेटवर्क सलगरे : मिरज पूर्व भागामध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. मान्सूनने दगा दिल्याने ...
दादा खोत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सलगरे : मिरज पूर्व भागामध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. मान्सूनने दगा दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामही वाया गेला आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. एकीकडे दुष्काळ येथील बळीराजाच्या मानगुटीवर बसत असताना, म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
म्हैसाळ योजनेचे आवर्तन खरीप हंगामात सुरु केले असते, तर भूजल पातळी स्थिर राहिली असती. खरीप वाया गेल्यानंतर सध्या ही योजना सुरू झाली आहे. योजना सुरु होऊन पंधरा दिवस झाले, तरीही अजून शेतकºयांच्या शेतात पाणी दिसत नाही. मिरज पूर्व भागातील शेतकºयांना पाणी मिळण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे.
मिरज पूर्व भागात द्राक्षबागांच्या छाटण्या रखडल्या आहेत. ज्या फळ छाटण्या झाल्या आहेत, त्यांना पाणी नाही. त्यामुळे येथील शेतकºयांची स्थिती बिकट झाली आहे. सलगरे, चाबुकस्वारवाडी भागातील शेतकरी टँकरने पाणी देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही मुख्य पाटातच दिसत आहे.
त्यातच मिरज तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने पूर्व भागावर अन्याय झाला आहे. मिरज पूर्व भागात दुष्काळ नसल्याचे ठरविताना कोणते निकष लावले, हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे. मिरज तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात वेगळी नेसर्गिक स्थिती आहे. याचाही विचार यावेळी झाला नाही. यामुळे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाण्याअभावी जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचेही आर्थिक गणित कोलमडणार आहे. शेतमजुरांचा प्रश्नही गंभीर बनणार आहे.
पैसे संकलन : भरणा नाहीच
म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसांत चाबुकस्वारवाडीतील ओढाकाठावरील शेतकºयांनी एक लाख रुपये गोळा केले होते. परंतु अजूनही हे पैसे म्हैसाळच्या अधिकाºयांनी भरुन घेतले नाहीत. द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून टँकरचा आधार घेत आहेत. अधिकाºयांकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता, हा भाग आमच्या विभागात येत नाही, अशी धक्कादायक उत्तरे दिली जात आहेत.