सांगली जिल्ह्यात दुष्काळ! सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा; मार्चमध्ये तीव्रता वाढण्याची चिन्हे
By संतोष भिसे | Published: February 12, 2024 06:00 PM2024-02-12T18:00:13+5:302024-02-12T18:00:46+5:30
संतोष भिसे सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ ...
संतोष भिसे
सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ गावे आणि ३९२ वाड्यावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून ५३ गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यामध्ये जत तालुक्यातील ५०, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावे
जत : निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ - प्रत्येकी १. सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ - प्रत्येकी २. एकूण टँकर : ५०
आटपाडी : आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर - उंबरगाव प्रत्येकी १. एकूण टँकर : ०३
म्हैसाळ योजनेने तारले
सध्या म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असून जत तालुक्यात पाणी पोहोचले आहे. या पाण्यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील बहुतांश गावांच्या पाझर तलावांत पाणी टिकून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तूर्त तरी नाही. अर्थात, मार्चअखेरपासून टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.