दुष्काळप्रश्नी राज्य सरकार उदासीन
By Admin | Published: December 2, 2015 12:05 AM2015-12-02T00:05:00+5:302015-12-02T00:37:52+5:30
पतंगराव कदम : नेवरी येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
नेवरी : राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. अद्याप कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. ठोस धोरण नाही यामुळे दुष्काळाची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, मी मदतकार्य व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या आपत्तींमध्ये साडेबारा हजार कोटींची मदत दिली होती, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव क दम यांनी केले.
नेवरी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. कदम बोलत होते. ते म्हणाले की, गावाबाहेरील आंबेगाव ते नेवरी तसेच नदीवर जाणाऱ्या महादेव बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता ही कामे भविष्यात पूर्ण करून देईन. लोकांनी गट-तट विसरून एकत्र येऊन गावचा विकास करणे गरजेचे आहे. आतापर्यंत माझ्यासाठी या गावाने चांगले योगदान दिले आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. नेवरीतील युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चांगली फळी निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम चांगल्या पध्दतीचे झाले आहे.
यावेळी बांधकाम ठेकेदार किरण चव्हाण यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यालयात ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची सुसज्ज स्वतंत्र कार्यालये आहेत.
या कार्यक्रमासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शांताराम कदम, सरपंच बाळासाहेब महाडिक, उपसरपंच मोहन सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते रंगराव महाडिक, जालिंदर महाडिक, कडेगावच्या सभापती सौ. लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, इंद्रजित साळुंखे, सौ. मालन मोहिते, बाजीराव पवार, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी, माजी सरपंच विष्णू महाडिक, सुनील महाडिक, नंदकुमार महाडिक, कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, नेवरीचे तलाठी डी. एल. चवरे, ग्रामविकास अधिकारी एस. जे. तेरदाळे, मंडल अधिकारी एस. पी. तिटकारे उपस्थित होते.
योगेश महाडिक यांनी प्रास्ताविक केले. महादेव महाडिक यांनी आभार मानले. (वार्ताहर)