दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालणार!- - पंढरीनाथ नागणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:41 PM2019-08-24T23:41:35+5:302019-08-24T23:44:23+5:30
आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू झाल्याने आता नागरिकांना स्वस्त व दर्जेदार सफरचंद उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. - पंढरीनाथ नागणे
अविनाश बाड ।
दुष्काळी आटपाडीत थेट सफरचंदाचे सौदे सुरू झाले. कारण काही वर्षांपूर्वी आजारी पडले तरच घरात सफरचंद आणली जायची. आता मात्र उपवासालाच नव्हे, तर दररोज फळे खाणाऱ्यांची, किंवा एकवेळ जेवण आणि सायंकाळी फक्त फळे खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे व्यावसायिक फायद्याबरोबरच भागात स्वस्त, दर्जेदार आणि ताजी सफरचंद मिळावीत यासाठी आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू केले, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी दिली.
प्रश्न : आटपाडीसारख्या दुष्काळी भागात सफरचंदाचे सौदे करण्याची कल्पना कशी सुचली? त्यासाठी काय-काय करावे लागले?
उत्तर : सफरचंद जेवढ्या उंच भागावरील असेल तितके चांगले. आटपाडी, पंढरपूर, मंगळवेढा, जत, खानापूर, दहीवडी, खटाव, अकलूज या परिसरात दरवर्षी सुमारे ३०० ट्रक सफरचंद खपतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र वर्षभर खपणारे एकमेव फळ आहे. त्यातून ही कल्पना सुचली. १९९६ पासून डाळिंब व्यवसायात आहे. देशभर डाळिंबामुळे व्यापाºयांशी संबंध आले. पाच वर्षे आपल्या भागात किती सफरचंद विकतात, त्याचे सर्वेक्षण केले. मग जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तिथल्या शेतकºयांशी मैत्रीच केली. दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालण्याचे समाधान जास्त आहे.
प्रश्न : इतरांच्या तुलनेत ग्राहकांना ताजी आणि कमी दरात सफरचंद आटपाडीत कशी काय मिळतील?
उत्तर : आता इंटरनेटचा जमाना आहे. सफरचंद तोडण्यापासून ट्रक भरेपर्यंतचे फोटो-व्हिडीओ तिथून पाठवतात. ट्रकला जीपीएस प्रणाली लावल्यामुळे माल कुठेपर्यंत आला, तेही कळते. पाचव्या दिवशी आटपाडीत सकाळी विक्री होते. विक्रीच्या दिवशी पहाटे येथे ट्रक यावा, असे नियोजन करतो. येथे व्यापारी दुसºया पेठेतून सफरचंद आणत होते. हे अंतर, त्याची वाहतूक याचे पैसे वाचतात. शिवाय दुसºया बाजारपेठेत गेल्यास तेथे मुक्काम करावा लागला, तर तोही खर्च वाचतोय्. शेतकरी ते छोटा व्यापारी यांचे कमिशन वाचते. त्यामुळे इतरांच्या तुलनेत येथे कमी दरात सफरचंद मिळतात.
यापुढे काय आव्हाने आहेत?
सर्वात आधी कोणी धाडस करत नाही. पण प्रतिसाद मिळाला की, अनेकजण कॉपी करतात. मग सगळा विचका होऊ शकतो. मी दहावीत हिंदी सोडून सगळ्या विषयात नापास झालो. शाळा सोडली, पण मला येत असलेल्या हिंदीच्या जोरावर देशातील सगळ्या बाजार समित्या पालथ्या घातल्या. या भागातून पहिल्यांदा डाळिंब विकायला दुबईला गेलो. अनेक देश फिरलो. निकोप स्पर्धा असली, तर चुरस निर्माण होते. ग्राहकांनाही त्याचा फायदा होतो. पण यापुढे या दुष्काळी भागात आंब्याचे सौदे करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेली तीन वर्षे कोकणात जाऊन पाहणी व अभ्यास करतो आहे.
तीन प्रतीत सफरचंदांची विभागणी होते. अगदी हलक्या प्रतीच्या सफरचंदाला गिराण म्हणतात. दुसºया प्रतीची सफरचंद आठ-दहा दिवस टिकतात. ज्युससाठी किंवा अनेक ठिकाणी काळ्या, तांबूस डागासह विकली जातात. प्रथम दर्जाची सफरचंद शीतगृहाशिवाय एक महिना टिकतात. परिसरात त्यांचा सुगंध दरवळतो.