तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश
By घनशाम नवाथे | Updated: April 12, 2025 21:29 IST2025-04-12T21:29:01+5:302025-04-12T21:29:55+5:30
१९८६ पासूनचा मुद्देमाल : गांजा, ब्राऊन शुगरसह काेकेनचा समावेश

तब्बल ८४ लाखांचा अमली पदार्थाचा साठा नाश
घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : जिल्ह्यातील नऊ पोलिस ठाण्याकडील १७ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला ८१३ किलो वजनाचा तब्बल ८४ लाख रूपयांचा गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन असा अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला. १९८६ पासून ते २०२४ पर्यंतचा हा साठा केंद्रीय अमली पदार्थ गोदामात जमा होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार कायद्यातील तरतुदीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही प्रक्रिया पार पाडली.
मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ॲन्टी ड्रग्ज टास्क फोर्सच्या बैठकीत जप्त अमली पदार्थाचा साठा नाश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एनडीपीएस ॲक्ट प्रमाणे अमली पदार्थाची लागवड, वाहतूक, विक्री अशा १९८६ पासून ते २०२४ पर्यंतच्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल केंद्रीय अमली पदार्थ गोदामात पडून होता. अधीक्षक घुगे यांनी तो नाश करण्यासाठी गुन्हे अन्वेषणला आदेश दिले.
गुन्हे अन्वेषणच्या पथकातील संकेत मगदूम, सोमनाथ पतंगे व कर्मचाऱ्यांनी या मुद्देमालाबाबत न्यायालयात पाठपुरावा करून तो नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करून घेतले. तसेच पोलिस महासंचालक, दहशतवादविरोधी पथक, सीआयडी, विविध केंद्रीय यंत्रणा यांच्याकडूनही मुद्देमाल नाश करण्यासाठीची परवानगी घेतली.
९ पोलिस ठाण्यांनी १७ गुन्ह्यात जप्त केलेला अमली पदार्थाचा साठा एनडीपीएस ॲक्ट १९८५ मधील कलम ५२ (अ) नुसार मिरज एमआयडीसी मधील सूर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. लि. येथे दि. ११ रोजी दुपारी एक ते सायंकाळी साडे सहा यावेळेत बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, रासायनिक विश्लेषक समाधान नरवडे, वैधमापन निरीक्षक उदय कोळी, प्रदुषण नियंत्रणचे क्षेत्र अधिकारी सचिन हरभड, सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार आणि नऊ पोलिस ठाण्यांचे कर्मचारी उपस्थित होते. सूर्या सेंटरच्या डॉ. मेघना कोरे यांचे सहकार्य लाभले.
या पोलिस ठाण्याकडील मुद्देमाल
जिल्ह्यातील आष्टा, कुरळप, कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली ग्रामीण, उमदी, तासगाव, मिरज शहर, सांगली शहर या ठाण्याकडील १७ गुन्ह्यातील गांजा, ब्राऊन शुगर, काेकेन असा मुद्देमाल नाश केला.
दक्षता घेऊन मुद्देमाल नाश
दोन शासकीय पंच, कमिटी अध्यक्ष, सदस्य यांच्या समक्ष कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही, आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन नाश करण्याची प्रक्रिया पार पाडली. यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, कोल्हापूरचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैध मापन शास्त्र विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या उपस्थितीत व बंदोबस्तात प्रक्रिया पार पाडली.