वाळवा-शिराळ्याला मंत्रीपद, महामंडळांची आस -: पुन्हा चर्चा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:50 PM2019-06-11T23:50:48+5:302019-06-11T23:52:19+5:30
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची
अशोक पाटील ।
इस्लामपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यामध्ये शंभर दिवसांसाठी का होईना, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवाय इस्लामपूर मतदार संघातील काही नेत्यांची महामंडळांवर वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणूक आमदार नाईक यांनी भाजपचा झेंडा घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. या घोषणेला पाच वर्षे होत आली. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा १४ जूनरोजी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये आ. नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे नेते विक्रम पाटील व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव शिंदे यांना यापूर्वीच महामंडळावर घेण्यात आले आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. आता दोघांच्या अधिकृत निवडी जाहीर होणार आहेत. यासाठी या दोघांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी सुरू आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष डोके वर काढू लागला आहे. आ. नाईक यांनी उभ्या केलेल्या संस्था तोट्यात असल्याचा आरोप राष्टÑवादी आणि काँग्रेसने सुरू केला आहे. त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर उपाय म्हणून शंभर दिवसांसाठी का होईना, आ. नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांची प्रतिमा उजळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
आश्वासनांची पूर्तता होणार का?
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात भाजपला ऊर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद, विक्रम पाटील, वैभव शिंदे यांना महामंडळ, तर महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना उमेदवारीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता झाली नाही, तर येथील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार आहे.
१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांत महामंडळावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा होणार आहे.
- विक्रम पाटील, भाजपचे नेते