दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

By admin | Published: May 23, 2017 11:31 PM2017-05-23T23:31:53+5:302017-05-23T23:31:53+5:30

दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

Dry drink made of Ranaragini | दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

दारूबंदीसाठी विट्यातील रणरागिणी सरसावल्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील मशिदीजवळ सुरू असलेले देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्यासाठी मंगळवारी विट्यातील महिला आक्रमक झाल्या. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून त्रास सहन करणाऱ्या रणरागिणींनी नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून, दुकान बंद करण्याची मागणी केली. यावेळी पालिकेने संबंधित देशी दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द करण्याचा ठराव मंगळवारी मासिक सभेत घेतला.
येथील यशवंतनगरमध्ये देशी दारूचे दुकान आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमार्गालगतची सर्व दारू विक्री बंद झाली असून, पाचशे मीटरच्या बाहेर असलेले, आळसंदचे हिंमतराव जाधव यांचे एकमेव देशी दारूचे दुकान सुरू आहे. त्यामुळे विट्यासह ग्रामीण भागातील तळीरामांची संख्या येथे वाढली आहे. परिणामी, महिला व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.
संतप्त महिलांनी मंगळवारी दुपारी पालिका व उत्पादन शुल्कच्या कार्यालयावर धडक दिली. नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मुख्याधिकारी महेश रोकडे यांना महिलांनी निवेदन देऊन, संबंधित दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकारी रोकडे यांनी, दुकान बंद करण्याचा अंतिम निर्णय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारात आहे. मात्र, नाहरकत प्रमाणपत्र रद्दबाबत सभेत ठराव घेऊन तो संबंधित विभागाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर महिलांनी उत्पादन शुल्क कार्यालयाकडे मोर्चा वळविला. दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांना घेराव घालून, किती दिवसात दुकान बंद करणार, असा जाब विचारला. त्यावेळी पाटील यांनी, दुकान बंद करण्याची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी शैला दिवटे, देवता आळंदे, मंगल लोटके, अनिता चोथे, कालिंदी कांबळे, शोभा चोथे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
विटा नगरपालिकेने दुपारी मासिक सर्वसाधारण सभेत या दारूच्या दुकानाचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. हा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने यावेळी सांगितले.

Web Title: Dry drink made of Ranaragini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.