पाण्यासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 11:37 PM2015-12-29T23:37:40+5:302015-12-30T00:31:48+5:30
शिवसेना आक्रमक : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकतारी भजन
कवठेमहांकाळ : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या म्हैसाळ पाणी योजनेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मंगळवारी आपल्याच सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. शिवाय गांधीगिरी मार्गाने एकतारी भजनाचा कार्यक्रमही तहसील कार्यालयाच्या आवारात केला आणि विठ्ठलाला साकडे घातले.
म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सुरू करण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात तालुक्यात प्रथमच अनोखे आंदोलन जनतेला पाहायला मिळाले. म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेने ‘कोरडे ओढ’ आंदोलन केले. कडकलक्ष्मीच्या रूपातील कार्यकर्ता स्वत:च्या अंगावर आसुडाचे जोरदार फटके घेताना तहसील कार्यालयात आवाज घुमत होता आणि हा आवाज कशाचा आहे, हे पाहण्यासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी जमा झाले होते. आसुडाच्या फटक्यांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता.
दुष्काळी भाग ‘म्हैसाळ’च्या पाण्याविना तडफडत आहे. हे पाणी तात्काळ सुरू व्हावे म्हणून शिवसेनेने याचवेळी एकतारी भजन गायनाचेही आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप उभारून शेतकऱ्यांनी हातात वीणा, टाळ घेऊन विठ्ठलाला साकडे घातले आणि ‘झोपलेल्या शासनाला बा विठ्ठला जागे कर’, अशी विनवणी केली. तहसील कार्यालय आवारातच एकतारी भजन चालू असल्याचे समजताच गर्दी झाली आणि लोकांनी या आंदोलनाला पाठिंंबा दिला. आपल्याच पाठिंंब्यावर सत्तेवर असलेल्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. नायब तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी म्हैसाळ योजना सुरू करावी, अग्रणी नदीच्या पात्रातील बंधारे या पाण्याने भरून घ्यावेत, ढालगाव भाग आणि घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी द्यावे, तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, त्वरित चारा डेपो सुरू करावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या मागणीसाठी कवठेमहांकाळ बंदही पुकारला होता, परंतु शासन जागे झाले नाही. त्यामुळे यापुढच्या काळात पाणी आले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी दिनकर पाटील, संजय चव्हाण, अनिल बाबर, प्रकाश चव्हाण, अनिल पाटील, गुंडा पोतदार, मोहन पाटील, रमेश जाधव, संजय साठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)
अनोखे आंदोलन : तालुक्यात चर्चा
शिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होती. एकतारी भजनाचे सूर आणि आसुडाचे फटके दिवसभर ऐकू येत असल्याने गर्दी झाली होती. एकतारी भजनासाठी उभारलेल्या मंडपात ‘झोपी गेलेल्या शासनाने जागे व्हावे’, असे फलक शिवसेनेने लावले होते.