दुष्काळाच्या झळा...रंगपंचमी, होळी पाण्याविना खेळा!

By admin | Published: March 22, 2016 11:28 PM2016-03-22T23:28:00+5:302016-03-23T00:41:30+5:30

संघटनांकडून जनजागृती सुरू : सणांच्या निमित्ताने जिल्ह्यात पाण्याची आणीबाणी टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

Dry rain ... Play with colorful, Holi water! | दुष्काळाच्या झळा...रंगपंचमी, होळी पाण्याविना खेळा!

दुष्काळाच्या झळा...रंगपंचमी, होळी पाण्याविना खेळा!

Next

सांगली : जिल्ह्यातील निम्मा भाग तहानलेला असताना, आता येणाऱ्या होळी आणि रंगपंचमी या सणांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या बेसुमार वापरावर पुढाकार घेऊन अंकुश ठेवणे आवश्यक आहे. शहरातील पाण्याची नासाडी टाळण्यासाठी सामाजिक संघटनांनी प्रबोधन केले असले तरी तरुणांच्या उत्साहापुढे त्यास बंधने येत आहेत. मात्र यंदाची होळी, रंगपंचमी पाण्याविना साजरी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्थांनी केले आहे. बुधवार, दि. २३ मार्चला साजरी होणारी होळी आणि सोमवार, दि. २८ ला साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीला पाण्याची बचत हा मंत्र जपावा, अशीही हाक देण्यात आली आहे.
भारतीय सणांमध्ये सर्वाधिक उत्साह देणारा सण म्हणजे होळीचा सण. होळी पेटवून सण साजरा केला जातो. हिवाळ्यात सुरू झालेली थंडी होळीपासून कमी होते, असे अनुभवी लोक सांगतात. शहरात होळी रस्त्यावर साजरी करण्यात येत असल्याने प्रदूषण वाढते, रस्त्याची आणि पर्यावरणाची हानी होते. अलीकडे हा सण पर्यावरणपूरक साजरा करण्याकडे कल वाढला आहे. त्यातही होळीमध्ये झाडे न जाळता टाकाऊ कचरा आणि इतर निरुपयोगी साहित्य जाळण्याची संकल्पना अनेक ठिकाणी राबविण्यात येते आहे.
उत्तर भारतात होळीला रंगांची उधळण केली जाते. सांगली शहरातील काही भागात रंगांची उधळण करत होळी साजरी केली जाते. जिल्ह्यात रंगपंचमीला रंगांची उधळण होत असली तरी रासायनिक रंगांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, शिवाय पाण्याची मोठी नासाडी होते. सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पाण्याची नासाडी टाळणे आवश्यक आहे. अगदी आता शहरातही एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याने तरुणांनी होळीमध्ये, रंगपंचमीमध्ये पाणी वापर टाळण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शहरात अनेक ठिकाणी बॅरेलमध्ये अथवा काहिलीमध्ये पाणी भरून, तर काही ठिकाणी थेट शॉवर तयार करुन ‘रेन डान्स’ करीत रंगपंचमी साजरी केली जाते. यातून मोठ्याप्रमाणावर पाणी वाया जाते. त्याऐवजी सणांचा आनंद घेण्यासाठी पावडर शेडमधील, शरीराला अपाय न करणारे रंग वापरुन सणाचा आनंद द्विगणित करता येऊ शकतो. त्याचबरोबरच अनेक ठिकाणी सध्या रंगीबेरंगी फुलांची उधळण करत सण साजरे केले जातात. त्यामुळेच प्रत्येकाने भान ठेवून पाण्याचा वापर टाळून सण साजरे करणे आता आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)


पाण्याचा काटकसरीने वापर करणे आता महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला, तर कोणताही संवेदनशील माणूस पाण्याचा अति वापर निश्चितच करणार नाही. राज्यात पाण्यासाठी २२ जणांचे प्राण गेल्याने, पाण्याचे मोल प्रत्येकाला कळले आहे. महत्त्वाचे म्हणजे नैतिकदृष्ट्या आजही समाजाला पाणी वाचविण्यासाठी आवाहन करावे लागते, हे चुकीचे आहे. जिल्ह्यातील एक भाग दुष्काळात सापडला असताना, कोणीही पाण्याचा वापर करून होळी अथवा रंगपंचमी साजरी करु नये.
- अ‍ॅड. अमित शिंदे
सामाजिक कार्यकर्ते


मुळात होळीसारखे सण साजरेच करु नयेत, या मताचा मी आहे. पर्यावरणाची हानी करीत साजरे होणारे कोणतेही सण टाळले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात पाण्याची निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता, कोणीही पाण्याचा अतिरिक्त वापर करु नये. होळीला झाडांची तोड न करता आणि रंगपंचमीला पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे भान ठेवून सण साजरे केल्यास, पाण्याचा वापर न करताही सण साजरा करता येऊ शकतो.
- शिवाजी ओऊळकर, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Dry rain ... Play with colorful, Holi water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.