वाळवा-शिराळ्यात युवानेते दिशाहीन

By admin | Published: March 24, 2016 11:14 PM2016-03-24T23:14:28+5:302016-03-24T23:41:05+5:30

पक्षबांधणीकडे दुर्लक्ष : स्वनेतृत्वाचा गाजावाजा

In the dry-solids, the ivayets are directionless | वाळवा-शिराळ्यात युवानेते दिशाहीन

वाळवा-शिराळ्यात युवानेते दिशाहीन

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर -वाळवा व शिराळा तालुक्यातील ४८ गावांतील राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले सर्वच युवक नेते दिशाहीन होत चालले आहेत. पक्षबांधणीपेक्षा स्वयंभू नेतृत्वाचा गाजावाजा करून, राष्ट्रवादीच्या विरोधकांचे नेते आपणच आहोत असा भास निर्माण केला जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीवेळी एकत्र येणाऱ्या या विरोधकांना कधीच विजयश्री खेचून आणता आलेली नाही.काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले चिकुर्डेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील शिराळा मतदारसंघातील आहेत. परंतु त्यांनी इस्लामपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची भाषा सुरु केली आहे. याच मतदार संघातील माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक यांनीही विरोधकांची मोट बांधून, इस्लामपूर पालिकेसह विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. एकेकाळचे मित्र असलेले अभिजित पाटील आणि राहुल महाडिक आता नेतृत्वाची भाषा करु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय संबंध आगामी काळात कसे राहणार, याबाबत तर्क—वितर्क लढविले जात आहेत. या दोघांच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील मात्र अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी भाजपच्या ताकदीवर इस्लामपूर पालिकेत झेंडा फडकविण्याचे जाहीर केले असून प्रत्येक प्रभागात भाजपचा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. तेही आता स्वयंभू नेता असल्याची भाषा करीत असून, आपणच विरोधकांचा नेता असल्याचे मानून पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार जिल्ह्यातील शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, अभिजित पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. परंतु आगामी विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत नेतृत्ववादावरुन या दोघांमध्ये कसा मेळ बसणार?, हाही प्रश्न आहे.
हुतात्मा संकुलाचे राजकारण संकुलमर्यादितच होत चालले आहे. सर्वच पक्षांना समान अंतरावर ठेवून वैभव नायकवडी यांनी सोयीच्या राजकारणाचा पाढा गिरवला आहे. वाळवा आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची वेस त्यांनी कधीही ओलांडली नाही. गत विधानसभा निवडणुकीत अंतिम टप्प्यात त्यांनी गावाची वेस ओलांडून इस्लामपुरात प्रवेश केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यांचे पुतणे वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनी स्वत:चा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्यांना संकुलातूनच अडसर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना अनुकूल राजकीय निर्णय घेता येत नाहीत.


विरोधकांची एकजूट करणार : महाडिक
विरोधकांची ताकद एक होत नसल्यामुळे विरोधकांना नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत सर्व विरोधकांना एकत्रित करुन आर्थिक ताकदीसह साम, दाम, दंडाचा वापर करुन राष्ट्रवादीच्या विरोधात जशास तसा पर्याय उभा करू, असे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांनी सांगितले.

...तरच चांगला पर्याय
एकूणच वाळवा तालुक्यासह शिराळा मतदार संघातील ४८ गावांमधील युवा नेते राजकीय दिशाहीन असून, स्वयंभू नेतृत्वासाठी त्यांची धडपड सुरु आहे. या सर्वांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीविरोधात एकमुखी नेतृत्वाची मोट बांधल्यास, चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

Web Title: In the dry-solids, the ivayets are directionless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.