वाळवा-शिराळ्यात राजकीय हवा नरम
By Admin | Published: January 20, 2016 11:43 PM2016-01-20T23:43:05+5:302016-01-21T00:25:51+5:30
नेतेही गारठले : सत्ताधारी, विरोधी गट शांत
अशोक पाटील -- इस्लामपूर राज्यात सत्ता नसल्याने वाळवा-शिराळ्यातील आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व मानसिंगराव नाईक, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची हवा नरम आहे. दुसरीकडे राज्यात सत्ता असूनही मंत्रिपदाच्या कुंपणावर असलेले आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपने ताटकळत ठेवल्याने, ऐन थंडीत या नेत्यांसह कार्यकर्तेही गारठले आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे जयंत पाटील गटाचे आहेत. यापूर्वी कासेगावच्या देवराज पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. आता कोणत्या तालुक्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामेरीचे राष्ट्रवादीचे सदस्य रणजित पाटील उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.
माजी आमदार विलासराव शिंदे आष्टा पालिकेच्या राजकारणात व्यस्त आहेत. वाळवा तालुक्यात पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक गटाचे राजकारण महत्त्वाचे मानले जाते. परंतु अलीकडील काळात त्यांच्या गोटातही शांतता दिसत आहे. प्रत्येकवेळी त्यांची राजकीय भूमिका बदलत असल्याने कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शिक्षण संस्था, सूतगिरणी आणि चौंडी येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविण्यात आघाडीवर राहिलेले डांगे सध्या थंड आहेत.
हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी वाळवा तालुक्यातील राजकारण बाजूला करून, उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आता धरणग्रस्तांच्या प्रश्नाला हात घातला आहे. वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनीही या आंदोलनात मुसंडी मारली आहे.
कामेरीचे जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांनी इतरत्र लक्ष न देता बँकेवरच लक्ष ठेवले आहे, तर त्यांचे चिरंजीव जयराज पाटील व्यवसाय सांभाळत राजकारणात बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक विश्वास साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि उसाला चांगला दर यात गुंतले आहेत. याव्यतिरिक्त विरोधी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद संपविण्यासाठी शिवाजीराव देशमुख व सत्यजित देशमुख गटाच्या हातात हात देऊन ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत.
निवडणुका नाहीत : म्हणून वातावरणही नाही
सातारा-सांगली जिल्ह्यातून स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून द्यायच्या आमदारपदाची निवडणूक सोडली, तर नजीकच्या काळात कोणत्याच लक्षवेधी निवडणुका नाहीत. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर ते नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील, असे चित्र आहे. ते सध्या लग्नाचे मुहूर्त आणि दु:खद घटनेच्या ठिकाणी भेटी देण्यात व्यस्त आहेत.