वाळवा-शिराळ्यात नेत्यांचा गावभेटीवर भर
By admin | Published: January 21, 2015 10:47 PM2015-01-21T22:47:23+5:302015-01-21T23:59:13+5:30
फायद्याचे गणित : सदाभाऊंची आमदारकी हुकली
अशोक पाटील - इस्लामपूर -खासदार राजू शेट्टी यांच्या दुटप्पी धोरणामुळे साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा कमी ऊसदर देऊन वेठीस धरल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असतानाच मंत्रिपदासाठी उतावीळ झालेल्या सदाभाऊ खोत यांची आमदारकीची संधीही हुकली आहे. दुसरीकडे वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, आ. शिवाजीराव नाईक यांनी गावभेटीवर भर दिला असून, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांनी अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक यांच्याकडे सहकारी संस्थांची ताकद आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांच्या आर्थिक नाड्या राष्ट्रवादीच्या हातात आहेत. तरीही जयंतरावांनी गावभेटीवर भर दिला आहे. मंत्रिपदावर असताना दुरावलेल्या कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्यांशी त्यांनी संपर्क वाढवला आहे.
शिराळा तालुक्यात मोदी लाटेवर आमदार बनलेल्या शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळणार या आशेवर बसलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. नाईक यांनी सध्या मतदारसंघात शासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याकडे सहकारी संस्था भक्कम नसल्या तरी, मतदारसंघासाठी काम करण्याची धडपड आहे. यापूर्वी आमदार नसतानाही त्यांनी सर्वसामान्यांशी संपर्क ठेवला होता. त्याचाच फायदा निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. हेच गणित मांडून सध्या जयंत पाटील यांनी गावभेटीवर जोर दिला आहे. आभार दौऱ्याचे निमित्त करून पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रात आठ ते दहा गावांमध्ये ते भेटी देत आहेत. रात्रीच्यावेळी परिसरातील मोठे गाव निश्चित करून तेथे कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित केला जात आहे. जेवणावळी उठत आहेत. शिराळा मतदारसंघात काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांनीही मतदारसंघात संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडेही सक्षम संस्था नाहीत, मात्र त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यावर भर दिला आहे.
अस्तित्वाचा प्रश्न
वाळवा-शिराळ्यात राजकीय शांतता आहे. सदाभाऊ खोतही याच मतदारसंघातील आहेत. त्यांना आमदारपद मिळणे आता दुरापास्त झाले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून अस्तित्व टिकवावे लागणार आहे.