बिब्ब्या ठरतोय डाळिंब बागांसाठी कर्दनकाळ
By admin | Published: November 3, 2014 10:33 PM2014-11-03T22:33:44+5:302014-11-03T23:27:40+5:30
बागायतदार संकटात : म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे क्षेत्र वाढले
दादा खोत -सलगरे -मिरज पूर्व भागामध्ये सलगरे, चाबूकस्वारवाडी, बेळंकी या भागामध्ये डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून डाळिंबाला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे साहजिकच या भागामध्ये नवीन डाळिंब क्षेत्र वाढू लागले होते. परंतु बिब्ब्या या रोगाच्या घातक प्रभावाने संपूर्ण डाळिंब बागाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकरी साहजिकच ऊस व भाजीपाला व पिकाबरोबरच डाळिंबाकडे वळला; परंतु डाळिंबाचे पीक बिब्ब्याच्या विळख्यात सापडल्याने डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे. शेतकरी उभ्या असलेल्या बागाच तोडून टाकत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून डाळिंबासाठी मार्केटमध्ये उच्चांकी दर मिळत असल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले. डाळिंब पिकावर पानावर येणारे डाळिंब पिकाचे मृगबहार व हस्तबहार असे दोन महत्त्वाचे बहर घेतले जातात. परंतु मृगबहारात ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब छाटण्या घेतल्या, त्या बागांना जुलै-आॅगस्टमधील हवेमध्ये दमटपणा वाढल्यामुळे तेल्या रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेल्या रोगावर बुरशीजन्य औषधांचा मारा करूनसुद्धा हा रोग आटोक्यात आला नाही. शिवाय काही शेतकऱ्यांनी आॅरगॅनिक शेती तंत्राचा वापर करून डाळिंब लागवड केली आहे. तसेच बिब्ब्याविरहित टिश्यूकल्चर रोपांचा वापर करूनही रोगाच्या विळख्यातून या वेळेचा मृगबहार वाचू शकला नसल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून बागा काढून टाकणे व इतर लागवडीकडे वळणे पसंत केल्याने डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंब हे निश्चितपणे पैसे मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे बिब्ब्या, तेल्या रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे. तरच या तेल्याच्या विळख्यातून बागा वाचू शकतील.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
अल्टरनेरिया, लिक स्पॉट, सर्कोस्पोरा, फळावर येणारे ब्लॅक हॉर्ट, अॅन्थ्युकॅनोज, फळावर येणारा ब्लाइट, फळावरील सर्कोस्पोरा आणि ब्रोट्रायरिस आदी बुरशीजन्य रोगांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
चांगल्या उत्पादनासाठी आंबेमोहर पूर्व छाटणीची गरज
बिब्ब्या नियंत्रणासाठी आॅरगॅनिक शेतीतंत्राचा वापर वाढवणे
हवामानाचा अचूक अंदाज घेऊन फवारण्यांचे नियोजन करणे