दुधगावचा बंधारा धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:01+5:302021-03-27T04:27:01+5:30
अमोल कुदळे दुधगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील दुधगाव-खोची बंधारा धोकादायक बनला आहे. या ...
अमोल कुदळे
दुधगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील दुधगाव-खोची बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाऱ्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.
वारणा नदीला बारमाही पाणी असल्याने बंधारा कधीही रिकामा होत नाही. मात्र, चार दिवसांपूर्वी नदीचेे पाणी कमी झाल्याने बंधारा मोकळा झाला. बंधाऱ्याच्या बहुतांश पिलरच्या खालील दगडी बांधकाम निसटून गेले आहेत. यंदा पुन्हा पूर आल्यास दगड ढासळून पिलर निकामी होण्याचा धोका आहे.
या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर या बंधाऱ्यावरून अवजड वाहतूक बंद केली. दोन्ही बाजूंनी लोखंडी कमान उभी केली होती. सध्या ती मोडकळीस आली असून बंधाऱ्यावरून वाहनांची वाहतूक सुरू असते.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा व दळणवळणाच्या सोयीसाठी वारणा नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास बराच अवधी आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे पिलर निकामी होण्यापूर्वी दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे याकडे लक्ष नाही. या मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद आहे. त्यामुळे त्यांनी लक्ष घालून तत्काळ बंधारा दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
चौकट
पालकमंत्र्यांना भेटणार
दुधगाव-खोचीला जोडणारा वारणा नदीवरील बंधारा धोकादायक बनला आहे. बंधारा खचला तर या परिसरातील शेतकऱ्यांसह वाहतूकदारांची कोंडी होण्याची भीती आहे. बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी करणार असल्याचे सरपंच विकास कदम यांनी सांगितले.