दुधगावमधील महिलेचा खून पतीकडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:58 PM2017-08-09T23:58:49+5:302017-08-09T23:58:49+5:30

Dudhgaon woman murdered woman husband | दुधगावमधील महिलेचा खून पतीकडूनच

दुधगावमधील महिलेचा खून पतीकडूनच

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या गीतांजली उत्तम मोरे या महिलेच्या खुनाचा गुंता उलगडण्यात अखेर सांगली ग्रामीण पोलिसांना बुधवारी यश आले. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह पाचजणांना अटक केली आहे. कौटुंबिक व मालमत्तेच्या वादातून पतीनेच दोन लाखाची सुपारी देऊन पत्नीचा काटा काढल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे व पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी दिली. संशयितांपैकी तिघेजण कवठेपिरानचे, तर अन्य दोघे कवलापूर येथील आहेत.
अटक केलेल्यांत महिलेचा पती उत्तम वसंत मोरे (वय ४१, रा. नलावडे गल्ली, कवलापूर), आशिष संजय केरीपाळे (२१, रा निरवाने मळा, कवठेपिरान), सचिन बाबासाहेब चव्हाण ऊर्फ डिग्रजे (२७, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ कवठेपिरान), गणेश भगवान आवळे (२५, रा. मांगवाडा, कवठेपिरान) व नामदेव गणपती तावदरकर (४४, रा. नलावडे गल्ली कवलापूर) या पाच जणांचा समावेश आहे. पाचही संशयितांना १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून चार मोबाईल संच, चार सीमकार्ड, घराचा नकाशा काढलेली हस्तलिखित चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे.
दुधगाव येथील गीतांजली उत्तम मोरे (३२) या महिलेचा ५ आॅगस्ट रोजी सकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान घरात घुसून खून करण्यात आला होता. पती-पत्नीचे भांडण, मालमत्तेचा वाद, की नाजूक संबंध, या खुनामागे असू शकते, असा अंदाज करुन पोलिसांनी तपासाला गती दिली होती. सांगली ग्रामीण पोलिसांनी तिच्या पतीसह कवलापूर येथील एका नातेवाईकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या खुनात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने, खुनाची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
याबाबत पोलिस निरीक्षक डोंगरे म्हणाले की, उत्तम व गीतांजली या पती-पत्नीत गेल्या सहा ते सात वर्षापासून कौटुंबिक व मालमत्तेचा वाद होता. उत्तम याने सर्व मालमत्ता पत्नीच्या नावे केल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. पती-पत्नीकडून पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीही दाखल केल्या आहेत. २१ मार्च रोजी गीतांजलीने उत्तम व त्याच्या साथीदाराविरूद्ध, घरात येऊन दळप-कांडप यंत्राची मोटार चोरल्याची फिर्याद दिली होती, तर २० एप्रिल रोजी उत्तम याने पत्नी गीतांजलीसह चौघांविरूद्ध, घरात आल्याच्या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याची तक्रार दिली आहे. याशिवाय दोघांनी एकमेकाविरूद्ध अनेक तक्रार अर्ज पोलिसांत दिले. गीतांजलीच्या खुनाच्या आधी चार दिवस उत्तम याने जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडे ग्रामीण पोलिस पत्नीविरूद्ध कारवाई करीत नाहीत, अशी तक्रार केली होती. वास्तविक उत्तम याचा हा कांगावा होता. गीतांजलीच्या खुनाचा कट त्याने अडीच ते तीन महिन्यापूर्वीच रचला होता. त्यासाठी त्याने कवठेपिरान येथील आशिष केरीपाळे, सचिन चव्हाण व गणेश आवळे या तिघांना दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यातील काही रक्कम त्याने संशयितांना दिली आहे. घटनेदिवशी मुख्य संशयित उत्तम मोरे व त्याच्या मामाचा मुलगा नामदेव तावदरकर हे दोघेही कवलापूर येथे होते. जमिनीची मोजणी करण्यासाठी दोघेही गेल्याचे भासविले होते. मोबाईल लोकेशन व इतर गोष्टीही त्यांनी जाणीवपूर्वक तयार करून, खुनादिवशी आपण दुधगाव व परिसरात नसल्याचे रेकॉर्ड तयार केले होते. पण पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच त्याच्यावर संशय होता. त्याची कसून चौकशी केली असता त्याने, दोन लाख रुपयांची सुपारी देऊन कवठेपिरान येथील साथीदारांच्या मदतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सर्व संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पाचही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अडीच महिन्यापूर्वी कट
गीतांजलीच्या खुनाचा कट अडीच महिन्यापूर्वीच शिजला होता. पती उत्तम याने कवठेपिरानच्या तिघांना तिच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानंतर महिन्याभरापूर्वी या संशयितांना गीतांजलीचे घरही दाखविले होते. गीतांजली ही सकाळी रेडिओचा मोठा आवाज करून घरातील काम करीत असल्याचे संशयितांना माहिती होते. खुनाच्या दिवशी आशिष, सचिन व गणेश हे तिघे गीतांजलीच्या घराकडे गेले. संशयितांनी घरापासून थोड्या अंतरावर गाडी लावली. दिराकडून पैसे येणे आहे, असे सांगत हे तिघे घरात शिरले. घरात येताच एकाने दरवाजा लावून घेतला. त्यांनी वायरने गीतांजलीचा गळा आवळण्यास सुरूवात केली, पण तिने प्रतिकार केला. गळा आवळूनही ती मृत होत नसल्याचे पाहून संशयितांनी तिच्यावर चाकूने वार केले, असे पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी सांगितले.

गीतांजलीच्या खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. ज्या पतीवर संशय होता, तो दुधगावपासून फार दूर होता. त्याचे मोबाईल लोकेशनही कवलापूरच दाखवित होते.
त्याची कसून चौकशी केली तरी तो थांगपत्ताच लागू देत नव्हता. पोलिसांनी खबºयामार्फतही माहिती जमा केली. अखेर पुण्यातील घराच्या वादाचा मुद्दा समोर आला.
उत्तम व गीतांजली पुण्यात राहत असताना तिथे त्यांनी घर घेतले होते. पुण्यात या दाम्पत्याचा दळप-कांडपचा व्यवसाय होता. पण नंतर ते विभक्त झाल्यानंतर तेथील घराचा ताबा घेण्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. कधी गीतांजली पुण्यातील घराला कुलूप लावत होती, तर कधी उत्तम ते कुलूप तोडून स्वत:चे कुलूप लावत होता. या कामासाठी तो काही साथीदारांची मदत घेत असे.
पोलिस चौकशीत त्याने या साथीदारांची नावे उघड केली नाहीत. पोलिसांनी सातत्याने चौकशी केल्यानंतरही तो तपासाला दाद देत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला भावनिक आवाहन केल्यानंतर त्याने साथीदारांची नावे उघड केली. तसेच याच साथीदारांच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचेही कबूल केले.
सोशल मीडियावर हत्यारांसह छायाचित्र
गीतांजलीच्या खुनातील संशयित आशिष संजय केरीपाळे याने सोशल मीडियावर चाकू हातात घेतलेले छायाचित्र पोस्ट केले आहे. यातूनच त्याची मानसिकता स्पष्ट होते. हत्यारासह छायाचित्र टाकून अशा मानसिकतेचे तरुण गुन्ह्यासाठी सावज शोधत असतात. त्यामुळे नागरिकांनी अशा पोस्ट टाकलेल्या व्यक्तींविषयी माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक डॉ. काळे यांनी केले आहे.

Web Title: Dudhgaon woman murdered woman husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.