दुधगावकरांनी दिला शहिदांच्या कुटुंबाला मायेचा आधार
By admin | Published: November 4, 2016 12:04 AM2016-11-04T00:04:10+5:302016-11-04T00:04:10+5:30
शोकसभा, कँडल मार्च : नितीन देशाच्या कामी आल्याची ग्रामस्थांची भावना
दुधगाव : गावचा सुपुत्र नितीन कोळी याला देशाच्या सीमेवर लढताना वीरमरण आले. नितीन जाण्याचे दु:ख आहेच, परंतु तो देशाच्या कामी आला याचा अभिमानही आहे, असे उद्गार दुधगाव (ता. मिरज) येथे झालेल्या शोकसभेत ग्रामस्थांनी काढले.
सीमा सुरक्षा दलात आठ वर्षे सेवा झालेले नितीन कोळी यांना शुक्रवारी रात्री कुपवाडा येथील मच्छील सेक्टरच्या सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीवेळी वीरमरण आले. कुटुंबाचा आधार असलेल्या नितीन कोळी यांना वीरमरण आल्याने, त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु सर्व ग्रामस्थांनी कुटुंबियांना मायेचा आधार दिला.
बुधवारी सकाळी दहा वाजता नितीन कोळी यांच्या घरातून नैवेद्य घेऊन त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ कर्मवीर चौकातून वारणा नदीकाठी रक्षा विसर्जनासाठी दाखल झाले. तेथे वडील सुभाष कोळी, भाऊ उल्हास कोळी यांच्याकडून सर्व विधी करण्यात आले. त्यानंतर रक्षाविसर्जन झाले. यावेळी दुधगावसह सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, खोची परिसरातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी गावातून कँडल मार्च काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत ग्रामस्थ, तसेच विविध संस्थांच्यावतीने नितीन कोळी यांना आदरांजली वाहण्यात आली. कोळी कुटुंबियांना गावातील स्थानिक संस्था, विविध मंडळांकडून आणि वैयक्तिक स्वरूपातही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
शोकसभेत बलवडी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील वीरपत्नी अश्विनी पाटील यांनी नितीन कोळी यांच्या पत्नी संपदा, आई सुमन, वडील सुभाष यांना धीर दिला. त्या म्हणाल्या की, देशासाठी नितीन यांनी दिलेले बलिदान कदापी व्यर्थ जाणार नाहीत. सर्व भारतीय त्यांचा वसा घेतील आणि त्यांच्यासारखे अनेक दिलदार जवान निर्माण होतील. यातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घेऊन देशासाठी लढायला हवे. यावेळी पं. स. सदस्य प्रमोद आवटी, सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, अनिल कोले, श्रेणिक पाटील, उमेश आवटी, अॅड. संदीप लवटे, सतीश सांद्रे, बाबा सांद्रे, दादा सरडे, विलास आवटी, जी. एस. शिकलगार उपस्थित होते. (वार्ताहर)
कोळी समाज, जिल्हा परिषद, पं. स. सदस्यांकडून मदत
महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघटनेकडून राज्याध्यक्ष रमेश पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कोळी कुटुंबियांकडे सुपूर्द केला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या ६२ सदस्यांनी महिन्याचे मानधन कोळी कुटुंबियांना देण्याचे जाहीर केल्याचे, विद्यमान सदस्य भीमराव माने यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी यांनीही मिरज पंचायत समितीच्या सदस्यांचे महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले.