आयारामांंमुळे भाजपचे मूलनिवासी खपा
By admin | Published: February 8, 2017 10:56 PM2017-02-08T22:56:54+5:302017-02-08T22:56:54+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारीही नाकारली, सत्तेच्या खेळात खच्चीकरण
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेमध्ये मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आयारामांनी विचारात घेतले नसल्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेत्यांच्या निर्णयाबद्दल खदखद आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या रेडिमेड नेत्यांनी पक्षच हायजॅक केल्याची भावना जुन्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. पक्षाची शिस्त मोडायची नाही, म्हणून भाजपचे जुने कार्यकर्ते शांत आहेत; पण भविष्यात याच कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक होण्याचीही चिन्हे आहेत.
शहरी पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला ग्रामीण चेहरा देण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, भाजप युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, जत तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगी सुर्वे, उपाध्यक्षा लताताई डफळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ बाबर, विनोद गोसावी, माजी तालुकाध्यक्ष गणेश देसाई, तासगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष महेश पाटील, पलूसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश लाड, आटपाडीचे बंडोपंत देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गायकवाड, संपतराव देशमुख, विलास काळेबाग, जिल्हा सरचिटणीस अनिल कदम, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश गायकवाड, प्रल्हाद पाटील, प्रमोद धायगुडे, बाळासाहेब हाक्के या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.
पक्षाची सत्ता नसताना ग्रामीण भागामध्ये भाजपची विचारधारा रूजविली. कोणतीही सहकारी संस्था ताब्यात नसताना आणि आर्थिक पाठबळ नसतानाही पदरमोड करून पक्षाची बांधणी केली. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यात जुन्या कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. पण, सत्ता मिळाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही मूळ भाजप कार्यकर्त्यांचा विसर पडला आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपची विचारधारा खुंटीला टांगून काँग्रेस, राष्ट्रवादीतील सहकारी संस्था बुडविणाऱ्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनाच पाठबळ देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटपात कुठेही विचारात घेतले नाही. यामुळे भाजपमधील मूलनिवासी नेते, कार्यकर्ते सध्या पक्षीय विशेषत: पक्षातील नेत्यांच्या धोरणावर नाराज आहेत.
आटपाडीतील चित्र : जुने कार्यकर्ते अस्वस्थ
आटपाडी तालुक्यात भाजपची मूळ बांधणी बंडोपंत देशमुख, आप्पासाहेब काळेबाग, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गायकवाड, संपतराव देशमुख, विलास काळेबाग, जिल्हा सरचिटणीस अनिल कदम, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश गायकवाड, प्रल्हाद पाटील, बाळासाहेब हाक्के या कार्यकर्त्यांनी केली. या कार्यकर्त्यांनी आटपाडीत एक बैठक घेऊन जिल्हा परिषद चार गट आणि पंचायत समिती आठ गणांपैकी करगणी पंचायत समिती गणाची एकमेव जागा मागितली होती. मूळ भाजप कार्यकर्त्यांच्या पदरी ही जागाही पडली नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्यांच्याविरोधात आंदोलने केली, तेच भाजपचे मालक
जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्न, साखरसम्राटांविरोधात आंदोलने केली. तासगाव कारखाना वाचविण्यासाठीही आंदोलने केली. पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीपासून ते बूथ लावण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. या कार्यकर्त्यांवर याच साखरसम्राट, सहकारसम्राटांनी गुन्हे दाखल केले आहेत. अजूनही त्या गुन्ह्यातून आमची सुटका झाली नाही. तोपर्यंत ज्यांच्याविरोधात आंदोलने केली, तेच आता पक्षात आले असून, मालक बनले आहेत. यामुळे कुठे तरी खच्चीकरण झाल्यासारखे वाटते, अशी खंत भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश लाड यांनी व्यक्त केली.
दूध डेअरीही नसताना पक्ष ग्रामीण भागात पोहोचविला
राष्ट्रवादीचे नेते, माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भरभरून दिले. साखर कारखाने, दूध संघ, बँका सर्व काही दिले, परंतु याच राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर तेच नेते आता भाजपमध्ये आले आहेत. ते किती दिवस पक्षात राहणार आहेत? या उलट भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडे साधी दूध डेअरीही नसताना पक्षाची विचारधारा ग्रामीण भागात पोहोचविली. याच पक्षाला रेडिमेड कार्यकर्ते मिळाल्यानंतर मूळ कार्यकर्त्यांना बाजूला फेकले जाते, ही लोकशाहीची शोकांतिका आहे, अशी खंत आटपाडीचे भाजपचे कार्यकर्ते प्रमोद धायगुडे यांनी व्यक्त केली आहे.
जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविणार :
वाळवा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ४५ हजार सभासदांची नोंदणी आहे. पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. तरीही कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले नाहीत. भाजप तालुकाध्यक्ष शंकरअण्णा पाटील यांनाही उमेदवारी नाकारली आहे. आटपाडी, पलूसमधीलही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पक्ष शिस्त मोडायची नाही, म्हणूनच ते कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार आहेत. पण या कार्यकर्त्यांच्या व्यथा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत निश्चित पोहोचविणार आहे. जुने कार्यकर्तेच पक्ष वाढीसाठी फायद्याचे आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिली.