ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात रोगाची शक्यता : व्यापाºयांकडून दरात घसरण; डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:53 AM2018-02-08T00:53:52+5:302018-02-08T00:59:43+5:30
सांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.
जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा तोडा झाला असून, उर्वरित शेतातच आहेत. तसेच ५० हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. यामध्ये निर्यात द्राक्षाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० टक्के बागा खराब हवामानामुळे यापूर्वीच बाद झाल्या आहेत. ३५ टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे, तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील हंगाम लांबणार आहे. खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १६० ते १७५ रुपये दर मिळतो आहे. ढगाळ हवामानाचा गैरफायदा घेत या दरात लगेच कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्हाभर ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
यंदाच्या हंगामाची सुरुवात अवकाळीमुळे नुकसानीत झाली असतानाच, द्राक्ष काढणीच्या काळात ढगाळ वातावरण झाल्याने दलालांकडून द्राक्षाच्या दरात घसरण करण्यात येत आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.
खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत होते. बुधवारी सकाळपासूनच हवामान पूर्णपणे ढगाळ होते. वातावरणात गारवा कायम होता; तर काही ठिकाणी पावसाचे बारीक थेंब पडत होते. या वातावरणामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
जिल्ह्यात आणखी सात ते आठ दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. खराब हवामानाचा फायदा घेत द्राक्ष दलालांकडून द्राक्षाच्या दरात चार किलोच्या पेटीमागे दहा ते वीस रुपयांची घसरण करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची कोंडी झाली असून, ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.
आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील काही भागात ज्वारी काढण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळ हवामान आणि पावसाचे बारीक थेंब पडत असल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती आहे. हरभºयावर रोगांचा फैलाव वाढणार आहे. गहू पिकाचेही मोठे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पावसाच्या शिडकाव्याने द्राक्ष बागायतदार हबकले
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाचा तुरळक शिडकावा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्षबागायतीला पाऊस जरी घातक असला तरी, पान उत्पादकांना तारक ठरणार आहे. थंडीमुळे गारठलेल्या पानवेलींच्या वाढीसाठी पोषक आहे. ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस यामुळे हरभरा पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढणार आहे. शाळू पिकेही पावसामुळे धोक्यात येणार आहेत. शाळवाची कणसे भरण्यास पावसाने अडथळा निर्माण होणार आहे.