ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांना ‘डाऊनी मिलिड्यू’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:28 PM2017-11-19T23:28:20+5:302017-11-19T23:29:32+5:30
दादा खोत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.
यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश बागा पोंगा अवस्थेत दावण्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत. आॅगस्ट छाटणीच्या बागांमध्येही फुलोºयात मोठ्या प्रमाणात गळ होऊन बागांना फटका बसला होता. या सर्व संकटांतून ज्या द्राक्षबागा वाचल्या, त्या आता पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. राज्यात १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. पश्चिम महाराष्टÑासह सांगली जिल्ह्यात दोन दिवसात पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अगोदरच डाऊनी मिलिड्यूचा प्रादुर्भाव असणाºया द्राक्षबागांमध्ये हा रोग थैमान घालू लागला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याने दमट हवामानामध्ये डाऊनीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना या रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे.
औषध फवारणी...
फुलोºयातील बागांवर या ढगाळ हवामानामुळे अळीचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वच अवस्थेतील बागांना खराब हवामानाने घेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा दिवस-रात्र औषध फवारणीत व्यस्त दिसत आहेत.
पावसाचा शिडकावा
मिरज पूर्व भागातील सीमावर्ती सलगरे व चाबुकस्वारवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान तर होतेच, पण भर दुपारी बारा वाजता या भागात काही मिनिटे पावसाचा शिडकावा झाला. पण सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही.
बुरशीजन्य औषधांचा खर्च दुपटीने वाढला
यावर्षी महिनाभर रेंगाळलेला परतीचा मान्सून व नंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व ढगाळ हवामान यामुळे बुरशीजन्य औषधांच्या फवारणीत वाढ करावी लागल्याने, एकरी द्राक्ष उत्पादनामधील औषधांचा खर्च वाढत आहे. याशिवाय द्राक्षांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे. आॅगस्ट छाटणीच्या पक्व झालेल्या द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे धोका निर्माण झाला आहे.ं