मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत -: उपसाबंदीने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:19 AM2019-06-06T00:19:41+5:302019-06-06T00:22:47+5:30
जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत.
अशोक डोंबाळे ।
सांगली : जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत. जूनचा पहिला आठवडा संपत आला, तरीही पावसाची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्याचा बहुतांशी भाग पावसावर अवलंबून आहे. परंतु यंदा मान्सून वेळेत दाखल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाल्यास पेरण्या शंभर टक्के होतील. पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खरिपासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर बारमाही पाण्याची सोय आहे. तेथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी उसाच्या लागणी वाढल्या आहेत. याशिवाय टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेतून बहुतांशी क्षेत्र पाण्याखाली आले आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावात ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे.
कोयना व चांदोली धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा, तापमानातील वाढ या पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात होईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारपासून जिल्ह्यात उपसाबंदी लागू केली आहे. कृष्णा नदीमधून औद्योगिक व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांसाठी उपसाबंदी आहे. ऊस, केळी आणि भाजीपाल्यासाठी पाणी आवश्यक आहे, परंतु कृष्णा आणि वारणा नदीवर उपसाबंदी लागू करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष पावसाकडे आहे.
जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यातील पेरणी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम या कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील गावांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नदीकाठावरील अनेक गावांत आगाप सोयाबीन केला जातो, परंतु पावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.
खते, बियाणे : गोदामात पडून
शिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हटले जाते. तेथे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. हंगामासाठी कृषी सेवा केंद्राची खते आणि बियाणे उपलब्ध होत आहेत. परंतु पाऊस नसल्याने पेरण्या पूर्ण थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून आहेत.