वादग्रस्त वक्तव्यामुळे आर. आर. अडचणीत
By admin | Published: October 12, 2014 12:49 AM2014-10-12T00:49:06+5:302014-10-12T00:54:07+5:30
सांगली : बलात्काराबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आज,
सांगली : बलात्काराबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आज, शनिवारी अडचणीत आले. बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनसेच्या उमेदवाराला आमदार व्हायचे होते, तर किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा, असे वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी जाहीर सभेत केल्याची चित्रफीत खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दाखवली. आर. आर. पाटील यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांच्या सोज्वळतेचा बुरखा फाटला आहे, अशी टीकाही खा. पाटील यांनी केली.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे काल, शुक्रवारी रात्री झालेल्या प्रचारसभेत आर. आर. पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आले. या चित्रफितीत आर. आर. पाटील म्हणतात की, ‘आज मनसेचे कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले आणि म्हणाले, आमचा पाठिंबा तुम्हाला. मी विचारले का, तर म्हणाले, आमचा उमेदवार तुरुंगात आहे. त्याने असे कोणते पुण्यकर्म केले, असे विचारले असता म्हणाले, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. आता तो राहायला मिरजेत. त्याला आपल्या तालुक्याचा आमदार व्हायचे आहे, तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा. इकडे अर्ज भरला आणि तिकडे गुन्हा नोंद झाला.’
याबाबत खा. पाटील म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आर. आर. पाटील यांनी अशा संवेदनशील प्रश्नावर वक्तव्य करून महिलांचा अवमान केला आहे. यापूर्वी अनेक प्रकरणे त्यांच्यामुळेच दडपली गेली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात त्यांनी घरोघरी पोलीस उभे केले तरी, अत्याचार थांबणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. मुंबईतील मोर्चावेळी महिला पोलिसांवर अत्याचार झाले. तेव्हाही ते गप्प होते. तासगाव तालुक्यात महिलांवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यात काही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ शकली नाहीत, तर काही प्रकरणांचा तपास योग्यरीत्या झालेला नाही. महिलांच्या अत्याचारात त्यांचे बंधू व कार्यकर्त्यांचा हात आहे. केवळ आर. आर. पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच अत्याचारात वाढ झाली आहे. फार मोठा माणूस असल्याचा आभास निर्माण करून त्यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करीत त्यांनी सत्ता मिळविली आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार आहोत.
उपरोधिक टीका : पाटील
प्रचारसभेत आपण मनसेच्या उमेदवाराबाबत केलेली टीका उपरोधिक होती. या उमेदवारावर आतापर्यंत बेकायदा शस्त्र बाळगणे, विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद आहे.
आता हा दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार व महिलांच्या संरक्षणाबाबत मी गृहमंत्री असताना केलेल्या उपाययोजना अन्य कुठल्याही गृहमंत्र्यांनी केलेल्या नाहीत.
महिलांचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. यातून कोणी वेगळा अर्थ काढत असेल, तर मी खेद व्यक्त करतो. संपूर्ण भाषण ऐकून विरोधकांनी टीका करायला हवी होती.
भाजपचे खासदार संजय पाटील यांना माझ्यावर टीका करण्यापलीकडे काहीच काम नाही, असा टोला आर. आर. पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना लगावला. (प्रतिनिधी)