सांगली-मिरजेमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनवर संचारबंदीमुळे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:46+5:302020-12-23T04:23:46+5:30
सांगली : गेले नऊ महिने कोरोना व लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या हॉटेल व्यावसायिकांची नव्या संचारबंदीमुळे पुन्हा कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री ...
सांगली : गेले नऊ महिने कोरोना व लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या हॉटेल व्यावसायिकांची नव्या संचारबंदीमुळे पुन्हा कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांसाठी महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’ अर्थात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला खो बसला आहे. याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसणार आहे.
हॉटेल व्यावसायिक, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, परमीट रुम व बिअरबार व्यावसायिकांनी या निर्णयामुळे चिंता व्यक्त केली आहे. व्यवसायाला चालना मिळत असतानाच संचारबंदीमुळे मोठा फटका सोसावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात रात्री अकरानंतर संचारबंदीमुळे ग्राहक बाहेर पडणार नाहीत. यामुळे वर्षाअखेरचे सेलिब्रेशन जल्लोषात होणार नाही. याचा थेट फटका हॉटेलांच्या उलाढालीला बसेल. सांगली-मिरजेतील हॉटेल व्यावसायिक जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी जोरदार तयारी करतात. काहीजण सहकुटुंब बाहेर पडतात. फास्ट फूडची लाखोंची उलाढाल होते. या सर्वांवर विरजण पडले आहे.
सध्या हॉटेलना रात्री दहापर्यंतची वेळ आहे. वर्षाअखेरच्या सेलिब्रेशनसाठी ती काही तासांनी वाढवून मिळण्याची अपेक्षा होती; मात्र संचारबंदीने अपेक्षाभंग झाला आहे.
चौकट
ग्राहकांचे सेलिब्रेशन पार्सलवर होणार
दहा वाजता हाॅटेल्स बंद होणार असल्याने ग्राहकांचा भर घरीच सेलिब्रेशन करण्यावर राहील. त्यासाठी पार्सलला मोठी मागणी राहण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली.
कोट
मार्चपासून बंद असणारी हॉटेल्स सध्या हळूहळू जम बसवत होती. ३१ डिसेंबरला मोठ्या संख्येने ग्राहक हॉटेलांमध्ये येण्याची अपेक्षा होती. आम्ही तयारीही सुरू केली होती, पण नव्याने लागलेल्या संचारबंदीमुळे नाकेबंदी झाली आहे.
- लहू भडेकर, अध्यक्ष, सांगली जिल्हा खाद्यपेय विक्रेता संघ
कोट
संचारबंदीमुळे वर्षाअखेरच्या लाखोंच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले आहे. सेलिब्रेशनसाठी किमान अकरापर्यंत वेळ देण्याची आमची मागणी आहे. संचारबंदीविषयी नेमक्या सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. लॉकडाऊनच्या काळातील नुकसान भरून काढण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री वेळ वाढवून देण्याची विनंती करणार आहोत.
- मिलिंद खिलारे, उपाध्यक्ष, खाद्यपेय विक्रेता संघ, सांगली
------------