खंडेराजुरीत भिंत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: July 11, 2016 12:59 AM2016-07-11T00:59:21+5:302016-07-11T00:59:21+5:30
संततधारेमुळे दुर्घटना : चार वर्षांची मुलगी जखमी; तहसीलदारांनी केली घटनास्थळाची पाहणी
मिरज : मिरज शहर परिसरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. खंडेराजुरीत पावसाने जुन्या घराची भिंत पडून बाबासाहेब तुकाराम चव्हाण (वय ५०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच कळंबीसह अनेक गावांत जुन्या घरांची पडझड झाली.
रविवारी दिवसभर संततधार पावसाने मिरजेसह ग्रामीण भागात ओढे-नाले भरून वाहत होते. शनिवारी रात्री खंडेराजुरीतील गांधीनगर येथे चव्हाण वस्तीवर जुन्या घराची भिंत पडल्याने बाबासाहेब चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर चव्हाण यांची पत्नी व चार वर्षांची मुलगी बचावली. पावसाने चव्हाण यांच्या जुन्या घराची माती, विटांची भिंत कोसळली. भिंतीजवळ झोपलेले चव्हाण यांच्या अंगावर ढिगारा पडून ते गंभीर जखमी झाले, तर त्यांच्याशेजारी झोपलेली चार वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली. विटा डोक्यात पडल्याने मार लागून जखमी झाल्याने चव्हाण यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तेथे त्यांचा मृत्यू झाला.
चव्हाण यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच प्रभारी तहसीलदार शेखर परब, पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला. कळंबीतही पावसाने रविवारी जुन्या घरांची पडझड झाली. तानाजी इनामदार यांच्या घराची भिंत पडून शेळी जखमी झाली, तर इनामदार कुटुंबीय सुदैवाने बचावले.