सांगलीत कृष्णा नदीतील मासे मृत, पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटल्याचा दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 12:33 PM2018-02-04T12:33:51+5:302018-02-04T12:34:22+5:30
कृष्णा नदीतील प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली आहे.
सांगली- कृष्णा नदीतील प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली आहे. महापालिका, ग्रामपंचायती आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नदीप्रदुषणाने गंभीर रुप धारण केले आहे.
सांगलीत यापूर्वीही अनेकदा नदीतील मासे मृत होण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पाण्यातील आॅक्सिजन नाहीसा होऊन जलचर प्राण्यांवर परिणाम होत असताना शासकीय यंत्रणा नेहमीच झोपेचे सोंग घेत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून औपचारिकता म्हणून महापालिका व सांडपाणी सोडणाºया ग्रामपंचायतींना नोटीसा दिल्या जातात. त्यानंतर पुन्हा मंडळ आणि साºयाच शासकीय यंत्रणा प्रदुषणाकडे कानाडोळा करतात. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी १ कोटी लिटर इतके आहे. त्यामुळे प्रदुषणाचे हे प्रमाण किती भयंकर आहे, याची कल्पना येते. तरीही मंडळ, महापालिका किंवा नदीत सांडपाणी सोडणाºया ग्रामपंचायतींना याचे कोणतेही गांभिर्य नाही.
दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून नदीप्रदूषणापोटी महापालिकेला सव्वा कोटीचा दंड केला जातो. गेल्या चार वर्षांपासून हा दंड नित्यनियमाने भरलाही जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही अनेकदा दंडाची कारवाई झाली. एकूण दंडाची रक्कम आजअखेर ५ कोटीच्या घरात गेली आहे. दुसरीकडे प्रदूषण मंडळामार्फत नोटिसाही बजावल्या जात आहेत. महापालिकेकडूनही उत्तरांचा सपाटा सुरूच आहे. एकीकडे नदीप्रदूषणाचा आणि दुसरीकडे कागदी कारवायांचा खेळ जोमात आहे.
अधिकारी सुटीत व्यस्त
एकीकडे कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी पडलेले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुटीच्या आनंदात व्यस्त होते. वास्तविक अशा घटनांवेळी अधिका-यांनी किमान थोडे तरी गांभिर्य दाखवून घटनास्थळी येऊन तातडीने पंचनामा करायला हवा होता, मात्र ते दुपारपर्यंत नदीकडे फिरकलेच नाहीत.