मावा उधार मागण्यावरुन दोन गुंडांवर खुनीहल्ला : सांगलीत भरदिवसा थरारनाट्य; पोलिसांमुळे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:08 PM2018-12-20T23:08:41+5:302018-12-20T23:10:55+5:30
मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार
सांगली : मावा उधार मागण्यावरुन झालेल्या वादातून दोघांवर खुनीहल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील बायपास रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा पंधरा मिनिटे हल्ल्याचे थरारनाट्य सुरू होते. हा थरार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पण कोणीही पुढे मदतीसाठी गेले नाही. निर्भया पथकातील पोलीस शिपाई भालचंद्र चव्हाण यांनी धाव घेतल्याने दोघेजण बचावले.
तुकाराम सुभाष मोटे (वय २४) व रोहित जगन्नाथ आवळे (२४, दोघे रा. संजयनगर, सांगली) अशी जखमी गुंडांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पान दुकानदार सुशांत शिवाजी सरगर (२५, छत्रपती कॉलनी, तात्यासाहेब मळा) व त्याचा आतेभाऊ विज्ञान श्रीकांत आलदर (२८, चिंतामणीनगर, माधवनगर रस्ता, सांगली) या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचे वृत्त समजताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरुन चाकू, लोखंडी गज व कोयता जप्त करण्यात आला आहे.
सुशांत सरगर याने तीन महिन्यांपूर्वी बायपास रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर ‘देवा’ पान शॉप हे दुकान सुरू केले आहे. गुरुवारी दुपारी त्याला भेटण्यासाठी आतेभाऊ विज्ञान आलदर आला होता. दोघेही पान दुकानात बोलत बसले होते. त्यावेळी तुकाराम मोटे व रोहिते आवळे आले. त्यांनी मावा मागितला.
सरगरने ‘मावा उधार मिळणार नाही’, असे सांगितले. यावर मोटेने ‘आम्ही उधार कुठे मागत आहे, फुकट मागत आहे’, असे म्हटले. यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर मोटेने ‘समोर फळे विकणाऱ्या कुम्याकडून पैसे घे, आणि मावा दे, असे सांगितले. सरगरने ‘कुम्याने सांगितले तरच मावा देतो’, असे सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून मोटेला राग आला. त्याने सरगरच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाहून आलदर याने दुकानातील लोखंडी गज घेऊन मोटेच्या डोक्यात हल्ला केला. सरगर व विज्ञानने त्याठिकाणच्या शहाळे विक्रेत्याकडील कोयता व चाकू आणून मोटे व आवळेवर हल्ला केला.
पोलिसांमुळे दोघे बचावले
जिल्हा पोलीस दलाच्या निर्भया पथकातील पोलीस हवालदार भालचंद्र चव्हाण हे या मार्गावरुन निघाले होते. गर्दी पाहून ते थांबले. धारदार हत्याराने हल्ला सुरू असल्याचे लक्षात येताच ते मारामारी सोडविण्यास पुढे गेले. हल्ला करणाºया सुशांत सरगर व विज्ञान आलदर या दोघांना रोखून धरले. पण गर्दीतील एकही व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी गेली नाही. चव्हाण यांनी गर्दीतील लोकांना पोलीस ठाण्यात फोन करण्याची सूचना केली. मात्र एकानेही फोन केला नाही. शेवटी त्यांनीच फोन केला. त्यानंतर शहर पोलीस दाखल झाले. चव्हाण थांबल्यामुळे मोटे व आवळे बचावले.
सांगलीत गुरुवारी दुपारी माधवनगर रस्त्यावर बायपास रस्त्यावर दोन गुंडांवर खुनीहल्ला झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.