इस्लामपुरातील युवक नशिल्या पानाच्या आहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:28 PM2018-08-27T23:28:08+5:302018-08-27T23:28:12+5:30
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि उपनगरांतील पानपट्टी चालकांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी अनोखा फंडा अवलंबला आहे. पानामधून नशा येणारी पावडर घालून त्याची विक्री खुलेआम सुरु आहे. गुटख्यापेक्षाही यातून नशा अधिक येत असल्याने युवक वर्ग याकडे आकर्षित झाला आहे. या नशिल्या पावडर पानासाठी २५ ते ३० रुपयांची आकारणी केली जात आहे.
युवावर्ग पूर्वीपासूनच गुटखा, मावा याच्या आहारी गेला आहे. शासनाने यावर बंदी आणली असतानाही चोरून गुटख्याची विक्री सुरुच आहे. या नशेला पर्याय म्हणून पानपट्टी चालकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गुटखा, माव्यापेक्षा जास्त नशा येत असलेले पावडर पान विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या पानामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर टाकून त्याची विक्री केली जाते. या पानाची किंमत २५ ते ३० रुपयांपर्यंत आहे. याकडे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये मंदिरांलगत असलेल्या पानपट्ट्यांमध्ये सर्रासपणे मावा, गुटख्यासोबतच या पावडर पानाची विक्रीही जोमात सुरु आहे. हे पान रंगत नाही, परंतु त्याने नशा मात्र चांगली होते. हे पान चघळतच फाळकूटदादा, रोडरोमिओ, महाविद्यालयीन युवक मुली, महिलांची छेड काढताना दिसतात. या पानाच्या नशेमुळे चांगल्या घरातील युवक गुन्हेगारीकडे वळण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
यापूर्वी ‘लोकमत’ने शहरातील मंदिरांनजीक असलेल्या पानपट्ट्या हलविण्यासंदर्भात वृत्त प्रसिध्द केले होते. परंतु याकडे पालिका प्रशासन व पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे पानपट्टीवाले चांगलेच शिरजोर झाले आहेत. शहरात जवळजवळ २ हजारहून अधिक पानटपºया आहेत. यामध्ये बोटावर मोजण्याइतपतच व्यावसायिक योग्यप्रकारे आपला व्यवसाय करतात. उर्वरित ९० टक्के पानपट्ट्यांमधून पावडर पान, गुटखा, मावा, तसेच इतर नशेचे साहित्य विक्री केले जाते. याची माहिती पोलिसांनाही मिळालेली आहे. परंतु याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले आहे.