सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:26 PM2019-05-10T23:26:33+5:302019-05-10T23:28:39+5:30

जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते.

Due to drought and rising cost of production, the decline in vehicle sales in Sangli district is 30% | सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम

सांगली जिल्ह्यात वाहनांच्या विक्रीत ३० टक्के घट--दुष्काळ, वाढत्या किमतीचा परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देवाहन उद्योगावर मंदीचे दाट सावट; तीन महिन्यातील चित्र

शीतल पाटील ।

सांगली : जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते. गतवर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या वाहनांपेक्षा यंदा तब्बल पावणेसहा हजारांनी वाहनांची संख्या घटली आहे. त्यामुळे वाहन उद्योगावर पुन्हा एकदा मंदीचे सावट आल्याचे विक्रेते सांगत आहेत.

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील ग्राहकांनी यंदा वाहन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. सधन तालुक्यातही फारशी चांगली स्थिती नाही. शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एफआरपीनुसार बिले मिळालेली नाहीत. साखर कारखान्यांनी बिलांचे तुकडे केल्याने ऊस उत्पादकांचीही परवड झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम यंदा वाहन उद्योगावर झाल्याचे दिसून येते. पूर्वी हौसेखातर वाहन खरेदी करणाºयांची असलेली संख्या वेगाने घटत चालली आहे. केवळ गरजवंतच वाहन खरेदीसाठी येत असल्याचे विक्रेते सांगतात.

शेतीसाठी उपयुक्त ट्रॅक्टर खरेदीचा आलेखही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यंदा तर ट्रॅक्टर विक्रीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे विक्रेते शेखर बजाज यांनी सांगितले. त्यात शेतकºयांना ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. हे अनुदानही वेळेवर शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाही. ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकºयांची परवड पाहून, इतर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यापासून चारहात दूरच चालल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यात वाहनांच्या किमतीतही १० ते १५ हजाराची वाढ झाली आहे. शासनाने वाहनाचा विमा एक वर्षावरून पाच वर्षे केला आहे. विम्यापोटीच सात ते आठ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वाहनांच्या अ‍ॅण्टी ब्रेक सिस्टिममुळेही किमतीत मोठा फरक पडला आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकूणच वाहनांच्या वाढत्या किमतीचाही परिणाम विक्रीवर जाणवू लागला आहे. यंदा गुढीपाडवा, अक्षय तृतीया यासारख्या सणालाही वाहन खरेदी करणाºयांची संख्या बरीच रोडावली आहे. वाहनांच्या शोरूममध्येही चौकशीसाठी ग्राहक येत नसल्याचे दिसून येते.

आरटीओ कार्यालयाकडे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात गतवर्षी व यंदा नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या पाहता, तब्बल ५७८१ वाहनांची विक्री कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या महसुलातही घट झाली आहे. केवळ एप्रिल महिन्याची आकडेवारी पाहिल्यास, वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट होते. गेल्यावर्षी म्हणजे एप्रिल २०१८ मध्ये सर्व प्रकाराच्या ७८११ वाहनांची विक्री झाली होती, तर यंदा एप्रिल २०१९ मध्ये ४३०७ वाहनांची विक्री झाली आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला तरच वाहन उद्योग टिकणार असल्याचे सांगण्यात आले.


बाजारात चलन ठप्प :खरेदीची हौस संपली
जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे वाहन खरेदीला फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के घट झाली आहे. बाजारपेठेत चलन फिरत नाही. त्यात केवळ गरज असलेला ग्राहकच वाहन खरेदीसाठी येत आहे. हौसेसाठी वाहन खरेदीची मानसिकता संपुष्टात आली आहे. ट्रॅक्टर खरेदीबाबत शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे दुसरा शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी कंपनीत येत नाही, असे बजाज अ‍ॅटो सांगलीचे शेखर बजाज म्हणाले.

 

गतवर्षीपेक्षा यंदा वाहन उद्योगावर मंदीचे सावट आहे. त्यात वाहनांच्या किमतीतही ११ ते १५ हजारापर्यंत वाढ झाली आहे. शासनाकडून विम्याची पाच वर्षाची रक्कम भरून घेतली जात आहे. कॉम्बी ब्रेक सिस्टिममुळेही वाहनांच्या किमतीत चार ते पाच हजाराची वाढ झाली आहे. वाहन जुने झाले, म्हणून नवीन खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकताच संपली आहे. वाहनांच्या शोरूमकडे चौकशी, बुकिंगसाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.
- बिपीन साळसकर, मिलेनियम होंडा, सांगली


 

Web Title: Due to drought and rising cost of production, the decline in vehicle sales in Sangli district is 30%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.