जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:50 PM2019-05-29T19:50:12+5:302019-05-29T19:51:57+5:30
जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
संख : जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अनुकूल हवामानात कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक म्हणून डाळिंब प्रसिद्ध आहे. डाळिंबामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला होता. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी शेततळी, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. तालुक्यात यावर्षी केवळ ४०.३ मी. मी. इतकाच पाऊस झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.
अनेक भागात सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेतील झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत.
शेतात फक्त वाळलेल्या झाडांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
तालुक्यामध्ये २०१२ ला दुष्काळ पडला होता. तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागा जगविण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.