दुष्काळाच्या प्रश्नाकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: June 3, 2016 12:27 AM2016-06-03T00:27:03+5:302016-06-03T00:44:35+5:30
जयवंत माळींचा आरोप : तासगाव पंचायत समिती सभापतींची स्टंटबाजी; फेरसर्व्हेक्षणाची मागणी
तासगाव : तासगाव तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. मात्र पंचायत समितीचे पदाधिकारी दुष्काळाबाबत गांभीर्यहीन आहेत. एकाही पदाधिकाऱ्याने दुष्काळी भागाला प्रत्यक्ष भेट दिली नाही. सभापतींकडून केवळ राजकीय स्टंटबाजी केली जात असल्याची टीका पंचायत समितीचे सदस्य जयवंत माळी यांनी पत्रकार बैठकीत केली. मणेराजुरीतील बोगस नळकनेक्शन शोधण्यासाठी फेरसर्वेक्षणची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
तासगाव तालुक्यात ३० गावांत भीषण पाणीटंचाई आहे. या गावांतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चारा, पाण्याची अवस्था भीषण आहे. अशा परिस्थितीत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता होती. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील राजकारण न करता दुष्काळाला शत्रू मानून काम करण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील पदाधिकाऱ्यांकडून केवळ राजकीय स्टंटबाजी केली जात आहे. प्रादेशिक नळपाणी योजनांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यावेळी पैसे भरण्यापूर्वीच खासदार संजयकाका पाटील यांच्या आदेशाने वीज कनेक्शन जोडण्यात आले होते. मात्र सभापतींनी त्याचे राजकारण केले. खासदारांमुळे नव्हे, तर पैसे भरल्यामुळे योजना सुरु झाल्याचे सांगितले. सभापतींची टीका ही केवळ राजकीय स्टंटबाजीतूनच आहे. पदाधिकाऱ्यांकडून केवळ राजकारण केले जात आहे. एकाही पदाधिकाऱ्याने दुष्काळी गावातील परिस्थितीला भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप माळी यांनी केला.
तालुुक्यातील प्रादेशिक योजनांची अवस्था बिकट आहे. पाणीपट्टी वसुलीत अडथळे येत आहेत. मात्र मणेराजुरीत पाणीपट्टी वसूल होऊनदेखील पंचायत समितीकडे वर्ग केली जात नाही. मणेराजुरीची २०११ च्या जणगणनेनुसार सुमारे १३ हजार लोकसंख्या आहे. या गावात प्रादेशिक योजनेची अवघी ५८० नळ कनेक्शन असून, सहा लाख ५० हजार लिटर पाणी दिले जाते. याउलट भैरववाडीसारख्या गावात ५४७ लोकसंख्येसाठी शंभर कनेक्शन असून, ४० हजार लिटर पाणी पुरवण्यात येते. यावरुनच मणेराजुरीतील बोगस नळकनेक्शनचा अंदाज येत असल्याची टीका जयवंत माळी यांनी केली. सभापतींच्या गावातच प्रादेशिक योजनेची वाताहत झाली आहे. पाणीपट्टीची सुमारे ४४ लाख रुपये रक्कम थकित आहे. त्याचा परिणाम अन्य गावांवरही होत आहे. त्यामुळे गावातील बोगस नळकनेक्शनचा सर्व्हे करण्याची माणगी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्याचेही माळी यांनी सांगितले. (वार्ताहर)
चर्चा नाही : बदल्यांमध्येच स्वारस्य
पंचायत समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील भीषण दुष्काळाबाबत काहीही चर्चा केली नाही. पदाधिकाऱ्यांना दुष्काळात स्वारस्य नसल्याचेच सभेतून दिसून आले. याउलट पारदर्शी आणि शासन नियमाप्रमाणे झालेल्या बदल्यांत स्वारस्य दाखवून बदली प्रकिया पुन्हा घेण्यासाठी ठराव घेण्यात स्वारस्य दाखवल्याची टीकाही यावेळी जयवंत माळी यांनी केली.
दुष्काळात मागणीनुसार टॅँकर - स्वाती लांडगे
मणेराजुरीत गटविकास अधिकाऱ्यांनी नळ कनेक्शनचा तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत एकही बोगस कनेक्शन सापडले नाही. पाणीपट्टी वसुलीसाठी पंचायत समितीचा प्रयत्न चालू आहे. दुष्काळात मागणीनुसार टँकर तातडीने सुरू करण्यात येत आहेत. चारा छावण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया तासगाव पंचायत समितीच्या सभापती स्वाती लांडगे यांनी सांगितले.