दुष्काळाची तीव्रता : प्रत्येक गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:03 PM2019-05-28T12:03:35+5:302019-05-28T12:05:48+5:30
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर्जन्यमापक केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
खोत म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळ निवारणार्थ शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या आठ उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही जनतेच्या मागणीनुसार तिथे आवश्यक वाटेल तिथे सोयी-सुविधा देण्यात येत आहेत.
दुष्काळ निवारणासाठी निधीची तरतूद करताना त्या भागातील पर्जन्यमान विचारात घेतले जाते. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करतानाही पावसाचे प्रमाण पाहिले जाते. सध्याच्या परिस्थितीनुसार मंडलनिहाय पर्जन्यमापक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारा पाऊस संपूर्ण मंडलासाठी गृहीत धरून निर्णय घेतले जातात. परंतु, यामुळे मंडलमधील एखाद्या गावावर अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणूनच आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक केंद्र उभा करण्यात येणार आहे.
गावनिहाय पर्जन्यमापक केंद्राची उभारणी केल्यानंतर पावसाची अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याद्वारे दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रांची उभारणी करण्यात येईल.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी समूह गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या शेतकरी समूह गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचल्यास शेतकऱ्यांना दरही चांगला मिळेल. प्रत्येक गावानुसार शेतमालाचे वैशिष्ट्य ठरत असते. याचा उपयोग करून घेऊन शेतमालाचे ब्रँडिंग करण्याचा विचार आहे.
विटा येथे द्राक्ष, पाणी, देठ तपासणी केंद्राची उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी आतापर्यंत सात लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या या केंद्राच्या उभारणीसाठी अजूनही काही निधीची आवश्यकता असून, तोही निधी लवकरच देण्यात येणार आहे, असेही खोत म्हणाले.