दुष्काळाच्या गहिवराने आबांचे स्मरण

By admin | Published: February 15, 2016 11:39 PM2016-02-15T23:39:16+5:302016-02-16T00:17:35+5:30

तासगाव शहरातील चित्र : डिजिटल फलकांतून उमटल्या कार्यकर्त्यांच्या भावना

Due to drought, remember | दुष्काळाच्या गहिवराने आबांचे स्मरण

दुष्काळाच्या गहिवराने आबांचे स्मरण

Next

दत्ता पाटील -- तासगाव --माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाला आज, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यकर्त्यांनी तासगाव शहरासह गावोगावी डिजिटल फलक उभे केले आहेत. आबांच्या पश्चात तालुक्यातील पाणी योजना ठप्प असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळाच्या गहिवरानेच कार्यकर्त्यांनी आबांचे स्मरण केल्याचे दिसून येत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गेल्यावर्षी १६ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यावरही शोककळा पसरली. मात्र आबांच्या राजकारणाच्या सुरुवातीपासून आबांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता आजही आबांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलेला नाही. गेल्या वर्षभरात तालुक्यातील राजकारणासह सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले. काही कार्यकर्ते सोडून गेले. काही सत्तास्थाने ताब्यातून गेली, तर काही सत्तास्थाने आणखी भक्कम झाली. आबांच्या निधनाचे दु:ख पचवून त्यांच्या कुटुंबियांनीही हळूहळू तालुक्याची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र आबांच्या जाण्याने तालुक्याचे आणि कार्यकर्त्यांचे झालेले नुकसान स्पष्टपणे जाणवत आहे.
आबांच्या पश्चात तालुक्याच्या वाट्याला वनवास आल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांच्या तोंडातून उमटत आहे. आबा असते, तर दुष्काळी परिस्थितीत तालुक्यालाच नव्हे, तर जिल्ह्यालाही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. ‘आबा तुम्ही गेलात, पाणी गेलं...’ अशी स्पष्ट भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावोगावी आणि तालुकाभर उभारलेल्या डिजिटल फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘ओसाड माळरानावर जेव्हा पाणी खळखळत जाईल... गावा-गावातील भांडण गावातच सोडवले जाईल... स्वच्छतेसाठी जेव्हा गाव हातात खराटा घेईल... आबा तुमची आठवण येईल’ अशा शब्दांत जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांवर कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी केली आहे.


आबांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष सोडून काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘फितूर झाले लाख तरी... झुंज आम्ही देणार. .. गद्दारांना गाडून... आबासाहेबांचे विचार पुढे नेणार...’ अशा शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांवर डिजिटल फलकांच्या माध्यमातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.


आबांच्या लोकाभिमुख अभियानांना तडे
‘पाणी गेले... तंटामुक्तीला मुक्ती मिळाली, डान्स बारबाला नाचू लागल्या, मटका सुरू झाला, स्वच्छता अभियान बंद झाले म्हणून आबा परत या... अशाप्रकारे भावनिक साद घालणारे आणि भाजप सरकारच्या कारभारावर आसूड ओढणारे काही डिजिटल फलकही शहरात लावण्यात आले आहेत.

Web Title: Due to drought, remember

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.