दुष्काळाला गांभीर्याने तोंड द्या!
By admin | Published: November 6, 2015 11:36 PM2015-11-06T23:36:09+5:302015-11-06T23:37:28+5:30
जयंत पाटील : इस्लामपुरात समन्वय-पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
इस्लामपूर : तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे़ टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे़ शासनाने घोषित केलेल्या १३ गावांना विविध योजना मिळवून देण्याबरोबरच तालुक्यातील पिण्याचे व शेतीचे पाणी, चारा आदीचे योग्य नियोजन करावे लागेल़ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. लोकांना टंचाईची झळ बसू नये यासाठी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा, अशी सूचना आमदार शिवाजीराव नाईक यांनी केली़
इस्लामपूर येथील तहसील कार्यालयामध्ये तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य सभापती रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी, वीर कुदळे, उत्तम वायदंडे, अंकुश पाटील, तुकाराम पाटील, सौ़ प्रियांका सावंत, सौ़ वर्षाराणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीची बैठक झाली़ तहसीलदार सौ़ रूपाली सरनोबत यांनी स्वागत केले़
आ़ पाटील म्हणाले, तालुक्यातील २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू शकते. त्यासाठी पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यावर भर द्या. तालुक्यातील दुधारी, बावची, येडेमच्छिंद्र तलावातील गाळ काढावा लागेल़
याप्रसंगी रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या़ गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, महावितरणचे अभियंता उस्मान शेख, वाय़ एऩ पठाण, पाटबंधारेचे उपअभियंता राजेंद्र कांबळे, भूमी अधीक्षक श्रीमती सुवर्णा मसणे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ़ ए़ एम़ सुतार, पशुवैद्यकीय अधिकारी शाम पाटील यांनी खात्याचा आढावा मांडला.
मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपअभियंता रामचंद्र चव्हाण, बांधकाम उपअभियंता बी़ एल. हजारे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर नायब तहसीलदार डॉ़ सौ़ शैलजा पाटील यांनी आभार मानले़ (वार्ताहर)
अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी
आ़ जयंत पाटील, आ़ शिवाजीराव नाईक यांनी दोघांमध्ये समन्वय राखत दोन तास विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला़ याप्रसंगी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली़ आ. पाटील म्हणाले की, आमच्या काळात मटका बंद होता़ मात्र आता जोरात सुरू आहे़ पोलीस खात्याने कडक पावले उचलावीत़ दर तीन महिन्यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन तालुक्यात झालेली कामे, कामातील अडचणींचा आढावा घेऊ.