पूरपरिस्थितीमुळे बंद पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:39 PM2019-09-07T14:39:14+5:302019-09-07T14:42:01+5:30
सांगली जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. आता या सर्व 98 पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यात एका गावात 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. आता या सर्व 98 पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी पलूस तालुक्यात एका गावात 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत
सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 5 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 678 कुटूंबांना एकूण 42 कोटी 8 लाख 50 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील 36 हजार 125 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 22 कोटी 55 लाख 25 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे.
पूरबाधित 80 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 5 सप्टेंबर अखेर 80 हजार 257 कुटुंबांना एकूण 8025.7 क्विंटल गहू व 8025.7 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 63 हजार 290 इतक्या बाधित कुटुबांना 5 लिटर प्रमाणे 3 लाख 16 हजार 450 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
28 हजार 106 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 393 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 18 हजार 713 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1929 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत.
50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 99 हजार 698 शेतकऱ्यांच्या 50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.
वाणिज्य मिळकतीचे पंचनामे पूर्ण
पूरग्रस्त बाधित वाणिज्य मिळकतीच्या नुकसान झालेल्या बाधित गावांची संख्या 88 असून बाधित मिळकतीची संख्या 16 हजार 694 आहे. या सर्व मिळकतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 383 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 9 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे.
नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 44 लाख 52 हजार 400 इतकी आहे. जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 21 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 308 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 51.19 कोटी इतका आहे.