अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:15 AM2019-11-16T11:15:54+5:302019-11-16T11:16:33+5:30
गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विटा : गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु, आॅगस्ट महिन्यापासून पावसाने हाहाकार उडविला. या महिन्यात पोषक ठरलेला पाऊस नंतरच्या दोन महिन्यात मात्र बंद झाला नाही. त्यामुळे खरीप ज्वारी, सोयाबीन, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील १४ हजार ४५१ शेतकऱ्यांची १२ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी कुजून गेली आहे. पाऊस बंद झाला नसल्याने ज्वारीची कणसे उगवून ज्वारी काळी पडली आहे, तर सुमारे ३ हजार ७९ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १ हजार ६४२ बाधित शेतकऱ्यांच्या १ हजार १८० हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाही परतीच्या पावसाने नष्ट झाला आहे. तसेच १ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या ९८४ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही पावसाने वाया गेली आहेत.