वाढत्या तापमानामुळे पानवेली कोमेजू लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:13 AM2018-05-14T00:13:49+5:302018-05-14T00:13:49+5:30
दिलीप कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.
पानवेल ही नाजूक वनस्पती असून, पानवेलीच्या जोमदार वाढीसाठी सततचे ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि निचऱ्याची जमीन असावी लागते. पानवेली किमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला तग धरतात. मात्र वाढणाºया तापमानाचा घातक परिणाम पानवेलींवर दिसू लागतो. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागातून पाहावयास मिळते. यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर खाऊच्या पानमळ्यांची लागण केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रात पानवेलींची लागवड केली आहे. केवळ नरवाडला १०० हेक्टर क्षेत्रावर पानमळ्याची लागण झाली आहे. म्हणून या क्षेत्राला पानमळ्यांचे आगार समजले जाते. येथूनच संपूर्ण राज्यात पाने विक्रीसाठी पाठविली जातात. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठांना खाऊची पाने एजंटाकडून मागवून वाहतूक केली जाते. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
उन्हाचा पारा आणखी वाढल्यास पानवेलींच्या बुंध्याशी असलेले पानवेलीचे वेटोळे करपून पानवेली वाळून जाण्याची भीती पान उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक फटका बसणार आहे.
उत्पादकांसाठी उपाययोजना
मिरज तालुक्याचे कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी पानवेलींचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
पानमळ्याला उन्हाळ्याच्या कालावधित तुषार सिंचनाचा वापर करावा.
पाणी उपलब्ध असल्यास वाफ्याने पाणी द्यावे.
पानमळ्याची तटबंदी सेडनेटऐवजी उसाच्या पाल्याने करावी.
रसायनांचा वापर पूर्णपणे टाळून सेंद्रीय खतांचा वापर करावा.
उन्हाळ्याच्या कालावधित पानमळ्यातील सावली कमी करू नये.