अयोग्य वातावरणामुळे बेदाणा उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:36 PM2019-04-16T14:36:52+5:302019-04-16T14:38:40+5:30
पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर टाकावी लागली.
गजानन पाटील ।
संख : पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर टाकावी लागली. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे.
पाणी टंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. वर्षभरात ४८.३ मिलिमीटर पाऊस झालो. शेततलाव, कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून बागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. उमदी परिसरामध्ये शेतकºयांनी टँकरने पाणीपुरवठा करून बागा आणल्या आहेत.
अनुकूल हवामानामुळे यावर्षी द्राक्षवेलींना चांगले घड सुटले होते. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कांड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून बागेला पाणी कमी पडले. खताची मात्रा दिल्यावर पाणी जास्त लागते. पाणी कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड व मणी लहान तयार झाले. द्राक्षात साखर पाहिजे त्याप्रमाणात तयार झाली नाही. बेदाण्यासाठी २६ ते २८ इतके साखरेचे प्रमाण असावे लागते.
मात्र यंदा ते कमी होते. त्यातच अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळेही द्राक्षांमध्ये साखर कमी तयार झाली. परिणामी बेदाणा चपटा झाला. साडेतीन ते चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार तयार झाला नाही. वजनातही घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी एक ते दीड टन आला आहे.
द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ, संख, बेळोंडगी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकºयांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात १५० ते १९० रुपये भाव मिळत आहे. परंतु कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.