द्राक्षाला मागणी वाढल्यामुळे दराचीही तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:42 PM2019-02-11T17:42:22+5:302019-02-11T17:42:46+5:30
उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील
अशोक डोंबाळे
सांगली : उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील व्यापारी मोठ्याप्रमाणात शेतकºयांच्या बांधापर्यंत जाऊन द्राक्षाची खरेदी करू लागला आहे. काही व्यापारी संघटितपणे द्राक्षाचे दर पाडत असल्यामुळे, त्यांचा जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र जवळपास एक लाख २५ हजार एकर आहे. द्राक्षे हे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक बनले आहे. जिल्ह्याचे उसाचे उत्पन्न चार ते पाच हजार कोटी रुपये आहे, तर द्राक्षाचे उत्पन्न जवळपास सहा हजार कोटींच्या घरात गेले आहे. युरोपियन राष्ट्रांसह एकूण पंचवीसहून अधिक देशांमध्ये सांगलीची द्राक्षे निर्यात होत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही रेसिड्यू फ्री द्राक्षे, बेदाण्याला मागणी वाढत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याची शेतकºयांनी तयारी ठेवल्यास भविष्यात निश्चित द्राक्षांच्या खपात मोठी वाढ होईल व दरही चांगला मिळेल.
जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात उसासारखे जादा पाण्याचे पीक परवडत नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिकासाठीचे अनेक प्रयोग शेतकरी करीत असून नवीन वाण शोधून काढत आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांनी तर देशाला नवीन वाणाची ओळख करून दिली आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्षाची गोडी वाढली. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र दुष्काळी पट्ट्यात मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत.
मिरज तालुक्यातील आरग, बेडग, म्हैसाळ, सोनी, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, बोरगाव, पुणदी, वायफळे, डोंगरसोनी, खानापूर तालुक्यातील पळशी, करंजे, सुलतानगादे, हिवरे, खानापूर, विटा, पारे आणि जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातही द्राक्षाची लागवड वाढली आहे. दुष्काळी शेतकºयांच्या जीवनात द्राक्षामुळे गोडवा आला आहे.
जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोमात सुरु असून सुपर सोनाक्का, सोनाक्का, माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन या द्राक्षजातींबरोबरच कृष्णा सिडलेस, शरद सिडलेस, ज्योती सिडलेस ही काळी द्राक्षे, लाल-गुलाबी फ्लेम द्राक्षांचे देखील उत्पादन होते. द्राक्षाच्या दर्जानुसार प्रति किलो ३० ते ७० रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी येणार आहे. द्राक्षांची निर्यातही मोठ्याप्रमाणात वाढली आहे.