खत दरवाढीमुळे द्राक्ष उत्पादकांचा खर्च ४० टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:20+5:302021-05-20T04:28:20+5:30
एकरी द्राक्षबागेसाठी वर्षभरात सिंगल सुपर फॉस्पेट १५ पोती, डी.ए.पी, १०:२६:२६ आणि पोटॅश प्रत्येकी दोन पोती रासायनिक खत लागते. याशिवाय ...
एकरी द्राक्षबागेसाठी वर्षभरात सिंगल सुपर फॉस्पेट १५ पोती, डी.ए.पी, १०:२६:२६ आणि पोटॅश प्रत्येकी दोन पोती रासायनिक खत लागते. याशिवाय अन्य काही खतेही शेतकरी देतो. या सर्व खतांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आहे. या खर्चात ४० टक्के वाढ झाली आहे. म्हणजे एकरी २० हजार रुपये जादा खर्च शेतकऱ्यांचा होणार आहे. खत कंपन्यांनी महागाई वाढल्यावर दर वाढविले; पण खताचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा दर काही वाढत नाही. गेल्या दहा वर्षांत द्राक्षांचा दर २५ ते ३० रुपये किलोच्या पुढे गेला नाही. रासायनिक खते, कीटकनाशकांच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. खत दरवाढीवर पुन्हा जीएसटी करही केंद्राला भरावा लागतो, तोही शेतकऱ्यांच्या खिशातूनच. एकूण बिलाच्या ६ ते १८ टक्के जीएसटी भरावा लागतो, तो खर्च वेगळाच आहे. या सर्व खर्चाचा विचार केल्यास ४० टक्के जादा खर्च शेतकऱ्यांनी कुठून भरून काढायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादक महादेव पाटील यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना अस्वस्थ करायला लावणारे हे केंद्र सरकारचे धोरण कधी बदलणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.